लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला आहे. आता विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद झाली. यापत्रकार परिषेदत महाविकास आघाडीत कोण छाटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिका स्पष्ट करत उलट सुलट चर्चांना पूर्णविराम दिला.
विधानसभा निवडणुकीत मोठा भाऊ, छोटा भाऊ असं काही चालणार नाही. प्रत्येक मतदारसंघाबाबत चर्चा करून सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे. आणि मागच्या निवडणुकीचे संदर्भ विचारात ठेऊन आणि जागा वाटपाचा निर्णय घेऊ. लवकरात लवकर हा निर्णय होईल, असा आमचा प्रयत्न आहे. आज यासंदर्भात आमची प्राथमिक बैठक झालेली आहे, असे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
हाच प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भूमिका मांडली. पृथ्वीराज चव्हाण यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका सर्व पक्षांची आहे. वेगळं काही नाही. आणि यातूनच आमची एक वाक्यता दिसते, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्या उत्तरानंतर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी हसत प्रतिसाद दिला.
उद्धव ठाकरे यांनी गायलं गाणं
महाविकास आघाडीच्या जागावाटपात सर्वाधिक जागा मिळवण्यात शिवसेना म्हणजेच तुम्हाला यश आलं. मात्र, निवडणूक निकालानंतर तुमच्या मित्र पक्षांचा परफॉर्मन्स चांगला राहिला, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी गाणं म्हणत उत्तर दिलं आणि या गाण्यावर सगळ्यांनाच हसू आलं.
एक फार जुनं गाणं आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही. पवारसाहेब तुम्हाला नक्की माहिती असणार. माणिक वर्मा याचं ते गाणं आहे. ”पारिजात फुलला माझ्या दारी, फुले का पडती शेजारी, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. तरी देखील आम्ही पारिजातकाला खतपाणी घालण्याचं सोडणार नाही, असे स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची वज्रमूठ किती घट्ट आहे, हे अधोरेखित केले.