गद्दारांच्या बुडाखाली चूड लावणारच, उद्धव ठाकरे यांचा वज्रनिर्धार

लोकसभेच्या वेळी गद्दारांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला, त्याखाली धनुष्यबाण लावला आणि मते मागितली. पण विधानसभेत तसे होऊ देऊ नका. ही गद्दारी म्हणजे महाराष्ट्राला, शिवसेनेला लागलेला कलंक आहे. हा कलंक आपल्याला पुसायचा आहे, असे आवाहन करतानाच, गद्दारांच्या बुडाखाली चूड लावून महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा आणणारच, असा वज्रनिर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.  मनात आणले असते तर गद्दारांना थांबवू शकलो असतो. पैठणच्या भामटय़ाला तर सहज पकडले असते. पण ज्यांची मने सडली आहेत त्यांना थांबवून काय उपयोग? म्हणूनच गेट आऊट म्हणून त्यांना काढून टाकले, असे  सांगत पैठण, वैजापूर गद्दारप्रूफ करण्याचा संकल्पही उद्धव ठाकरे यांनी केला.

‘मी तुम्हाला जुन्या पेन्शनचे वचन दिल्यानंतर मिंध्यांना तिकडे घाम फुटणार आहे. त्यांनी अचानक ‘लाडकी बहीण’ योजना आणली, तसेच आता ते कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय घेतील. मात्र ज्या शिवसेनेने त्यांना राजकीय जन्म दिला, मोठे केले, त्या आईचाच, शिवसेनेचा त्यांनी विश्वासघात केला. ते सरकारी कर्मचाऱ्यांनाही फसवतील हे लक्षात ठेवा,’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसंवाद मेळाव्याला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन आदींची उपस्थिती होती. तर जुनी पेन्शन महाअधिवेशनाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर, सचिव गोविंद उगले, कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी आदींसह राज्यातील विविध विभागांचे कर्मचारी मोठय़ा संख्येने हजर होते.

हे तर फुकटखाऊ!

‘लाडकी बहीण’ योजनेचे श्रेय लाटण्यावरून महायुती सरकारमध्ये सुरू असलेल्या चढाओढीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. ‘पराभवानंतर आता त्यांना ‘लाडकी बहीण’ आठवली. पण भाऊ कोण हेच बहिणीला कळत नाही. प्रत्येकजण म्हणतोय, मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ! अरे, हे कसले भाऊ! हे तर फुकटखाऊ! जनतेच्या पैशांवर हे फुकटखाऊ म्हणतात, मीच तुझा भाऊ,’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

छत्रपतींचा असा अपमान कधीच झाला नाही

मालवणात छत्रपती शिवरायांचा पुतळा हवेने कोसळला. छत्रपतींचा असा अपमान कधीच झाला नाही. पेलवत नाही तर उभारू नका छत्रपतींचे पुतळे! उद्धव ठाकरे यांच्या मुखातून अंगारच बाहेर पडत होता. मोदीबुवांच्या हस्ते या पुतळय़ाचे अनावरण झाले होते. वाऱ्याने पुतळा हलला आणि कोसळला. नवी लोकसभा गळतेय, अयोध्येतील राम मंदिर गळतेय, आता ताजमहाललाही गळती लागलीय! असे हे गळके सरकार! ‘गळून दाखवले’ हा या सरकारचा नवा नारा, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.