मोदींचे कंत्राट 4 जूनला संपणार; देशात डिमोदीनेशन होणार! उद्धव ठाकरे यांचा जबरदस्त वज्राघात

>> माधव डोळे / महादेव मिसाळ 

ठाणे/डोंबिवली, दि. 16 – भाजपमध्ये मोदींचा चेहरा आता चालत नाही. पंतप्रधान म्हणून त्यांच्या या शेवटच्या सभा आहेत, सत्तांतर अटळ आहे. मोदींनी जसे अचानक देशाला धक्का देत डिमॉनिटायझेशन केले तसे 4 जूनला देशात डिमोदीनेशन होईल, असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. सभेपूर्वी झालेल्या तुफानी वादळी पावसाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, ऊन, वादळ, पाऊस आणि हुकूमशाही शिवसेनेला रोखू शकत नाही. मोदींचे देश चालवण्याचे पंत्राट 4 जूनला संपत आहे. 20 मे रोजी देशात मतांचा पाऊस पडेल आणि त्यानंतर मोदी पंतप्रधानपदी नसतील, झोला खांद्यावर अडकवून त्यांना जावेच लागेल, असा वज्राघात उद्धव ठाकरे यांनी केला तेव्हा तमाम जनसमुदायाने ‘जय भवानी जय शिवाजी…’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘महाविकास आघाडीचा विजय असो…’ अशा घोषणांनी डोंबिवली आणि ठाणे दणाणून सोडले.

ठाणे लोकसभेचे शिवसेना महाविकास आघाडी, इंडिया गठबंधनचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी गडकरी रंगायतनसमोरील रस्त्यावर, तर कल्याण लोकसभेच्या शिवसेना महाविकास आघाडी इंडिया गठबंधनच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची कान्होजी जेधे मैदान येथे विराट सभा झाली.

गणपत गायकवाडांना भेटलात का?

कल्याण पूर्वचे गणपत गायकवाड या भाजपच्या आमदाराने उद्विग्न होऊन पोलीस ठाण्यात गोळय़ा झाडल्या. त्यांना अटक झाली. मोदी त्यांना जाऊन भेटले का? गायकवाडांवर गोळय़ा झाडण्याची वेळ का आली? याची चौकशी कधी केली का? मिंधेंच्या सत्ताकाळात गुंडाराज सुरू झाले आहे. माझे करोडो रुपये त्यांच्याकडे आहेत, असे गायकवाड म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची सीबीआय, सीआयडी चौकशी का केली नाही? मनी लॉण्डरिंग प्रकरणात गुन्हा का दाखल केला नाही, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

कल्याण-डोंबिवलीची गद्दार अशी ओळख होऊ देणार नाही

हिंमत दाखवल्यावर सभेपूर्वी कोसळणारा पाऊसही थांबला. माझे आजोबा प्रबोधनकार म्हणायचे, संकटाच्या छाताडावर चालून जाण्याची हिंमत पाहिजे. त्या हिमतीने मी मैदानात उतरलोय. कल्याण-डोंबिवलीची ओळख गद्दार अशी कदापिही होऊ देणार नाही. गद्दारांना असे गाडा की, कित्येक पिढय़ा गद्दारीचा किडा इथे वळवळता कामा नये, असा उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला. तुमच्या डोळय़ांदेखत महाराष्ट्र लुटला जातोय आणि तुम्ही दाढी खाजवत दिल्लीपुढे शेपटय़ा घालून त्यांची चाकरी करता. हे तुमचे हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार आहेत काय? असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

जरा चंद्राबाबूंचा जाहीरनामाही बघा

हिंदुत्ववादी असल्याचा कांगावा करत असता मग नितीशकुमार आणि चंद्राबाबू हिंदुत्ववादी आहेत का? त्यांच्याशी तुम्ही कशी हातमिळवणी केली तेही सांगा. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून तो अल्पसंख्याकांसाठी आहे असा खोटा प्रचार करता तर मग जरा चंद्राबाबूंचा जाहीरनामाही वाचा आणि त्यात अल्पसंख्याकांसाठी जे दिले आहे त्यावरही आधी बोला, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

4 तारखेला टरबुजाचा भाव उतरणार

उद्धव ठाकरे यांनी ‘ते आपले पाव उपमुख्यमंत्री’ असा उल्लेख केला तेव्हा गर्दीतून टरबूज… टरबूज… असा आवाज घुमला. तोच धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले, मी चपरासी असलो तरी पुन्हा येईन… असे ते सांगत असतात. त्या अक्षय कुमारला मुलाखत देताना मोदींना आंबा कसा खायचा हे सांगितले. आता टरबूज कसं खायचं तेही शिकवा. कारण 4 तारखेला टरबुजांचा भाव उतरणार आहे, असे चिमटे उद्धव ठाकरे यांनी काढले.

आधी मातेचं दर्शन, मग गोमातेचं

गोहत्या केल्या तर उलटे टांगू असे अमित शहा भाषणात सांगत फिरत आहेत. मणिपूरमध्ये महिलांची अब्रू लुटली जात असताना तुम्ही का उलटे टांगले गेला होतात, तिथे का गेला नाहीत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, आम्ही आधी मातेचे रक्षण करणार… मग गोमातेचे… सावरकरांचे गाईबाबतचे विचार काय होते ते आधी वाचा. सावरकरांना भारतरत्न कधी देणार ते आधी सांगा? आणि मग त्यांच्याबद्दल आम्हाला बोलायला सांगा, असे उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना शालजोडीतून हाणले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

राजन विचारे बाळासाहेबांचे आणि दिघेंचे निष्ठावंत शिवसैनिक

गद्दार मिंधे 40 जणांना घेऊन पळाले तेव्हा ते राजन विचारे यांच्या  वाटय़ालाही गेले नाहीत. कारण विचारे हे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, असे गौरवोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले.

हे ठाणे माझ्या शिवसेनेचे

हे ठाणे माझ्या शिवसेनेचे आहे. पहिली पालिका ठाणेकरांनी दिली तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी ठाणेकरांना दंडवत घातला होता. यशाचं पहिलं माप ठाणेकरांनी शिवसेनेच्या पदरात घातलं. पहिल्या नगराध्यक्षांपासून सतीश प्रधान, मो. दा. जोशी, प्रकाश परांजपे अशी मालिका होती. 2012 महापालिका निवडणुकीत शिवसेनाप्रमुखांची तब्येत फार ठणठणीत नव्हती. पण ते म्हणाले मला एक सभा शिवतीर्थावर करायची आहे आणि दुसरी सभा ठाण्यात करायची आहे. ठाणेकरांना मला भेटायचं आहे. इतपं शिवसेनाप्रमुखांचं ठाणेकरांवर प्रेम होतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले तेव्हा बाळासाहेब ठाकरे झिंदाबादच्या घोषणा जनसमुदायातून उमटल्या.

मोदींनी आता पुन्हा हिंदू-मुस्लिम सुरू केले आहे. कालपर्यंत ते मुसलमानांना शिव्या घालत होते. पण त्यांना अचानक साक्षात्कार झालाय. ते म्हणू लागले आहेत की, मी लहानपणी मुस्लिम कुटुंबात वाढलोय. ताझियाच्या मिरवणुकीत खालूनही गेलोय. ईदला आमच्याकडे स्वयंपाक व्हायचा नाही. मुस्लिम कुटुंबाकडून जेवण यायचं. मग मोदीजी तुम्ही ज्याच्यावर बंदी घातली तेपण तुमच्या ताटात यायचं का? तेही तुम्ही खाल्लं का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

गोल्डन गँगने महापालिका लुटली

ठाण्यात शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर दहशत माजवण्याचे काम चालू आहे. गोल्डन गँगने महापालिका लुटून खाल्ली आहे. ठाणे पालिकेत फक्त 10 कोटीच राहिले आहेत, अशी बातमी मी वाचली आहे. कर्मचाऱ्यांचा पगार द्यायलाही पैसे नाहीत. मुंबई महापालिकाही ओरबाडून खात आहेत, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

ठाण्यातील सभेत  शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, बेलापूर जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी, काँग्रेसचे मुजफ्फर हुसेन, उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी, ओवळा-माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिधा मोहिते, ठाणे शहरप्रमुख प्रदीप शिंदे, माजी नगरसेवक एम. के. मढवी, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, विक्रम खामकर, सुभाष कानडे, शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मनोज शिंदे, अनिल काwशिक, प्रमोद सावंत, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, आपचे पदाधिकारी दिनेश ठाकूर, धनंजय शिंदे, संभाजी ब्रिगेडचे मनोज आक्रे तर डोंबिवलीतील सभेत शिवसेना उपनेते विजय साळवी, अल्ताफ शेख, उपनेत्या ज्योती ठाकरे,कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, रुपेश म्हात्रे, सुभाष भोईर, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, माजी महापौर रमेश जाधव, जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, हर्षवर्धन पालांडे,  शरद पाटील, प्रकाश तेलगोटे, सचिन बासरे, तात्या माने, प्रतीक पाटील  आदी उपस्थित होते.

रामाचा जप कमीउद्धव ठाकरेंचा जप जास्त

महागाई, बेरोजगारी, उद्योगधंदे, आरोग्य व्यवस्था आणि विकास यावर मोदी एक शब्दही बोलत नाहीत. आधी भाषणामध्ये राम राम करत रामाचा जप करायचे, पण आता रामाचा जप करत नसतील इतका उद्धव ठाकरेंचा जप करत आहेत. उद्धव ठाकरेंची इतकी भीती त्यांच्या मनात बसली आहे असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. 

वैशाली दरेकरांच्या भीतीने

‘विश्वगुरू’ कल्याणला आले

शिवसेनेची शक्ती काय आहे हे गद्दारांना दाखवण्यासाठीच मी वैशाली दरेकर यांना कल्याण लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मोदी आणि गद्दारांना येथे विजयाची खात्री होती. तर ते ‘विश्वगुरू’ माझ्या साध्या कार्यकर्तीच्या भीतीने इथे सभा घेण्यासाठी का आले? मणिपूरमध्ये महिलांची अब्रू लुटून त्यांच्यावर अत्याचार होत असताना मोदी तिथे का गेले नाहीत याची त्यांना लाज वाटायला हवी, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनो या माझ्यासोबत

ठाण्यात एखादा भाजपचा कार्यकर्ता उमेदवार म्हणून दिला असता तर लढायला मजा आली असती. मला भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि संघांच्या कार्यकर्त्यांबद्दल आपुलकी आहे. तुम्ही इतक्या खस्ता  खाल्ल्या, मेहनत केली. पण गद्दारांच्या सतरंज्या उचलण्याचे काम तुम्हाला करावे लागते. यात तुमचे आयुष्य का फुकट घालवताय. जसा मोदींनी मला डोळा मारला तसा मी त्यांना  सांगतो. तुमचे हिंदुत्वाचे विचार आहेत तर या माझ्यासोबत, हिंदुत्वाचा झेंडा आपण पुढे नेऊया, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

गद्दारांनी टेंभी नाकाही विकला – संजय राऊत

ठाण्याचा हा इलाका शिवसेनेचा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. इथे धमाका देखील शिवसेनाच करणार असून चोर बाजारातला माल कदापिही विकला जाणार नाही हे लक्षात ठेवा, असे फटकारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लगावले. ते पुढे म्हणाले, टेंभी नाक्यावर चोरांचे सरदार असून ते नेहमी माझीच शिवसेना खरी असे सांगतात. बाळासाहेबांचा विचार आम्हीच कसा पुढे नेत आहोत याचं तुणतूणं वाजवतात आणि नरेंद्र मोदी त्यांच्या मागे ढोल वाजवतात. पण बाळासाहेबांनी जाहीर सभेतून वारंवार महत्वाचा विचार आपल्याला सांगितला आहे. निष्ठsच्या बाबतीत ठाण्यात सुद्धा येऊन त्यांनी आपले परखड विचार मांडले आहेत. ते म्हणाले होते की, एक वेळ लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस. आज या माणसांनी स्वतŠलाही विकलं आणि निष्ठावंतांचा टेंभीनाकाही विकला. म्हणून ही लढाई निष्ठावंतांची असून ठाण्यातील जनता चोरीचा माल संसदेत कदापिही पाठवणार नाही. ठाणे शिवसेनेचे आणि शिवसेनेचेच राहील असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

दडपशाही कराल तर कळवा-मुंब्रा बंद करू – आव्हाड

प्रत्यक्ष मतदानाला दोनच दिवस उरले असताना पोलिसांनी मिंध्याच्या दबावाखाली कळवा मुंर्ब्यातील काही निष्ठावान शिवसैनिकांना 15 ते 19 मे या काळात शहराच्या बाहेर जावे अशा नोटिसा बजावल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर सभेत बोलताना सरकारला ठणकावले. ते म्हणाले की अशा प्रकारच्या नोटिसांना आम्ही घाबरत नाही. हिम्मत असेल तर अटक करून दाखवा. मात्र पोलिसांनी राज्यकर्त्यांचे हस्तक म्हणून वागू नये. अशीच दडपशाही कराल तर आम्ही देखील कायदा हातात घेऊ असे सांगत आव्हाड यांनी जाहीर सभेत पोलिसांनी बजावलेली नोटीस फाडून टाकली. एवढेच नव्हे तर वेळ पडल्यास मिंध्यांच्या विरोधात कळवा मुंब्रा देखील बंद करू असा इशारा दिला.

ठाण्यातील गोल्डन गँगकडून व्यापाऱ्यांची लूट – विचारे

ठाणे लोकसभा मतदार संघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आपल्या भाषणात 10 वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडत असतानाच या कामाचे श्रेय देखील गद्दार लाटत असल्याचा आरोप केला. शिवसेनेला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे पाहून गद्दारांनी पोलिसांच्या मदतीने कार्यकर्त्यांवर खोटय़ा केसेस लावण्याचे काम सुरू केले आहे. गोल्डन गँगचा प्रमुख नरेश म्हस्के याने महापालिकेला लुटण्याचे काम केले असून आता तो निवडणुकीला उभा आहे. ठाण्यातील व्यापारी व ज्वेलर्स यांना धमकावून पैसे उकळण्याचे काम सुरू आहे. पण ठाणेकर मतदारच या गद्दारांना त्यांची जागा दाखवतील असा विश्वास राजन विचारे यांनी व्यक्त केला.

डोंबिवलीच्या सभेवेळी पाऊस कोसळला. त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत गद्दारांना टोला हाणला. ठाण्यातही पाऊस कोसळेल, असे गद्दारांना वाटले असावे म्हणून ते रेडे कापायला गुहावाटीला गेले की काय, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच प्रचंड हशा उसळला.

 देशातील तरुणांना रोजगार देण्याऐवजी त्यांना पंत्राटावर ठेवणारे मोदी, शहा तिसऱ्यांदा एक्स्टेंशन मागत आहेत. त्यांना पाच वर्षांचं कॉन्ट्रक्ट दिलं होतं ते आणखी दहा वर्ष केलं. पण तुम्ही देश चालवू शकला नाहीत. म्हणून या 4 तारखेला देश तुमचं पंत्राट रद्द करणार आहे.

मोदींनी घाटकोपरमध्ये रोड शो केला. त्याच्या दोन दिवस आधी होर्डिंग पडून दुर्घटना झाली त्याच्याखाली अजूनही माणसं अडकली आहेत, असे म्हणतात. बचावकार्य सुरूच आहे. पण त्याच भागात दोन गल्ल्या सोडून मोदीजी तुम्ही कसला तमाशा केलात, कोणाला शो केलात? अहंकाराचा शो केलात. एवढी निर्दयता तुमच्यात आली कुठून?

धुवाधार पावसात उद्धव ठाकरे यांचे भिजत भाषण

उद्धव ठाकरे यांची डोंबिवलीतील 13 मे रोजीची सभा वादळी पावसामुळे रद्द झाली होती. ही सभा आज झाली. सभा सुरू होताच पुन्हा धुवाधार पाऊस कोसळू लागला. परंतु त्याची तमा न बाळगता उद्धव ठाकरे यांनी धो धो पावसात भिजत भाषण केले. आपले पक्षप्रमुख भरपावसात उभे राहून भाषण करीत असल्याने समोर उपस्थित गर्दीतील एकही शिवसैनिक आणि कार्यकर्ता जागचा हलला नाही.