लाडका मित्र, लाडका कॉन्ट्रॅक्टर आणि लाडका उद्योगपती अशी यांची योजना; उद्धव ठाकरे यांनी धारावी टेंडर घोटाळा केला उघड

मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा टेंडर घोटाळा उघड केला आहे. हे टेंडर रद्द करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासोबच धारावीकरांना मुंबईतून हाकलून लावण्याचा डाव असून अदानींच्या घशात जमिनी घालण्याचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. धारावीकरांसाठी रस्त्यावर उतरून पुन्हा आंदोलन करू, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईत शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी आज धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील मोठा घोळ उघड केला.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे महाबिघाडी सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पाडायला लागले आहे. त्यांनी आतापर्यंत जो कारभार केला आहे, ते सर्व विसरून जनता फसव्या घोषणांना बळी पडून मतदान करेल, अशी एक वेडी आशा त्यांना आहे. या योजनांमध्ये लाडकी बहीणसह बऱ्याच काही योजना आहेत. तसेच बाकीच्या योजनांचा जनता अनुभव घेते आहे. आणि आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही आवाज उठवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला दिला आहे.

लाडका मित्र, लाडका कॉन्ट्रॅक्टर आणि लाडका उद्योगपती योजना अशी यांची योजना आहे. त्या योजनेबद्दल आम्ही गेल्या वर्षी धारावीत मोठा मोर्चा काढला होता. धारावी पुनर्विकास प्रकल्पात धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर जिथल्या तिथे मिळालंच पाहिजे आणि तेही पाचशे चौरस फुटाचचं मिळालं पाहिजे. ही शिवसेनेची आग्रही भूमिका कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

धारवी ही केवळ फक्त झोपडपट्टी नाही तर त्यात एक वेगळेपण आहे. तिथल्या प्रत्येक घरामध्ये एक मायक्रो स्केलचा उद्योग चालतो. मग त्यात काही ठिकाणी कुंभार, ईडलीवाले, चामड्याचा उद्योग करणारे आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. त्या उद्योगधंद्यांचं करणार काय? हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. आम्ही मोर्चा काढला होता. बेसुमार टीडीआर काढून अदानीला द्यायचा त्यांचा जो डाव आहे, तो आम्ही उधळून लावू. तो कधीच यशस्वी होऊ देणार नाही. मुंबईभर अदानींकडून टीडीआर विकत घेतला पाहिजे, ही अट त्यांनी घातलेली आहे. त्याविरोधात आम्ही दंड थोपटले आहेत. गेल्या आठवड्यात काही बातम्या आल्या. या योजनांच्या धुरळ्यामागे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचं कसं ते चांगभलं करताहेत हे आम्ही उघड करतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदी आणि शहा यांनी गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळवून नेली आहे आणि मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे. कदाचित हे उद्या मुंबईचं नावही बदलतील आणि मुंबईच नावही अदानी सिटी करतील. आर्थात आम्ही ते कदापि होऊ देणार नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं उदाहरण आहे. मराठी माणूस एकवटला तर अनेकांच्या डोक्यात अहंकार घुसला होता तो उधळून लावतो. आणि मराठी माणूस मुंबई वाचवतो. मुंबईकरांना आवाहन आहे. जी मुंबई बाचव समिती आहे ती मुंबई रक्षक समिती आहे. मुंबईत जे काही यांचे चाळे सुरू आहेत, मुंबईला लुटायचं, मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला भिकेला लावण्याचं जे कारस्थान आहे, ते आम्ही कदापि होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले.

अदानीला हे टेंडर दिलं गेलं त्यावेळी टेंडरमध्ये नसलेल्या काही गोष्टी या आज ते देऊ करताहेत. त्या पैकी एक म्हणजे वारेमाप एफएसआय. धारावीचा प्रकल्प पाहिला तर 590 एकरचा भूखंड आहे. त्यात 590 एकरमध्ये तीनशे एकर हा गृहनिर्माणसाठी आहे. बाकीच्या जागेत माहीम नेचर पार्क, मग टाटाचा पावर स्टेशन आहे. एकूण टेंडरमध्ये कुठेही वाढीव टीडीआरचा उल्लेख नाहीये. आता धारावीत ते सर्व घरांना नंबर देत आहेत. म्हणजे धारावीकरांना पात्र-अपात्रतेच्या चक्रव्यूहात अडकवून हाकलून लावण्याचा डाव आहे. आम्ही एकाही धारावीकराला तिथून जाऊ देणार नाही. पण पात्र-अपात्रतेचा निकष लावून धारावी रिकामी करायची आहे. आणि रिकामी केलेली धारावी अदानीच्या घशात अलगद गेल्यावर हे भूखंडाचं श्रीखंड ओरबडायला तयारच आहेत. ही सगळी कारस्थानं मुंबईचं नागरी संतुलन बिघडवण्याचा डाव आहे. आपण मानसिक संतुलन बिघडलेली माणसं कोण आहेत आणि काय काय करताहेत ते आपल्याला माहिती आहेत. काहींच्या मानसिकतेला बुरशी आलेली आहे. अशी सगळी माणसं ती यामागे आहेत, असा वज्राघात उद्धव ठाकरे यांनी केला.

धारावी 590 एकरची आहे. प्रत्यक्ष टेंडरमध्येही धारावी नोटिफाईड भागात जे काही सहकार्य लागेल ते सरकार करेल त्यात काही गैर नाही. पात्र-अपात्र हे ठरवताना नंबर एवढे वाढवायचे की त्या जागेत प्रकल्प होऊच शकत नाही. मग अधिकची जागी हवी आहे. ही अधिकची जागा म्हणजे कुर्ल्यातील मदर डेअरी, दहसर टोलनाका, मुलुंड टोलनाक्याची जागा आहे. त्यानंतर मुंबईची मिठागरं… अशा 20 जागांची मागणी केली आहे. ही माहिती माहितीच्या अधिकारात मागवलेली आहे. धारावीचा आराखडा कोणाला माहिती आहे का, धारावी नक्की कशी विकसित होणार याचा कुठेही उल्लेख नाही. आणि अचानक हे सरकार लाडक्या मित्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी झोपडपट्टी योजनेतून जागा अधिग्रहीत करत आहे. हा काय प्रकार आहे? कोणासाठी करताहेत. जिथे मुंबईचे इतर प्रकल्प होणार आहेत त्या ठिकाणाला तुम्ही नख का लावताहेत. वाघनखं नसलं तरी सरकारी नख त्याला लावता आहात? असे उद्धव ठाकरे म्हणाले.

धारावीत तिथे रेल्वेची जागा आहे तिथे रेल्वेच्या जागेत आधी घरं बांधायची. त्यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये नव्हे घरांमध्ये शिफ्ट करायचं. जर यांना ट्रान्झिट कॅम्प किंवा मिठागरांच्या जागेवर हलवलं तर पायाभूत सुविधा कोण देणार? अदानी देणार? दहीसर टोलनाक्यावर हलवलं, तर तिकडे बस टर्मिनससाठी जागा मागितलेली. मुलुंडचा टोलनाका आहे. जिथे मुंबईचे इतर प्रकल्प आहेत जे मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी गरजेचे आहेत, तिथल्या जागा या अदानीच्या घशात घालायच्या. पुन्हा या जागांचा टीडीआर काढणार. ही जागा अदानी सोडणार नाही. मग इथेही किती काळ धारावीकर राहणार? त्यांच्या उद्योगधंद्याचं आणि रोजीरोटीचं काय होणार? तिथे ईडलीवाले आहेत, कुंभार, चामड्याचे उद्योग आहेत, गार्मेंटवाले आहेत, कोळीवाडा आहे. ही लोक तुम्ही ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवल्यानंतर तुम्ही इथल्या झोपडपट्टीधारकांना नवीन घरं देण्याऐवजी त्यांना पात्र-अपात्रतेचा निकष लावून मिठागरं किंवा इतरत्र पुन्हा झोपडपट्ट्यांमध्ये फेकणार, मग धारावी अदानीच्या घशात घालणार, हा मोठा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

एकूण टेंडरचा अभ्यास केला तर हे 189 पानाचं टेंडर आहे. या टेंडरचा अभ्यास केला तर यात कुठेही आज देऊ केलेल्या सोयीसुविधांचा उल्लेख नाही. म्हणजे ही मोठी फसवणूक आहे. या मध्ये ज्या कोणी सहभाग घेतला असेल त्यापैकी कोणी कोर्टात गेलं तर हे टेंडर रद्द होऊ शकतं. त्यामुळे अदानीसाठी तुम्ही मुंबईची विल्हेवाट लावणार असाल तर हे टेंडर रद्द करा. धारावीकरांना उचलून मिठागरांसह कुठेही टाकता येणार नाही. जर अदानींना इकडे जमत नसेल तर, अदानींनी सांगावं आपल्याला जमत नाही. त्यांनी टेंडर सोडून द्यावं. पुन्हा टेंडर काढा. आणि त्यात एकदाच तुम्ही स्वच्छ-पारदर्शक देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा आणि अटी शर्तींचा उल्लेख करा. पुन्हा नव्याने टेंडर काढा. धारावीकरांना तिथून आम्ही हाकलू देणार नाही. धारावीकरांना तिथेच पाचशे फुटाचं घर मिळालं पाहिजे. त्यांच्या उद्योगाची सोय तिथेच झाली पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे. आणि म्हणून अदानीच्या घशात मुंबई टाकण्याचा जो डाव आहे तो शिवसेना उधळून लावेलच. याचा फटका मुंबईकरांनाही बसू शकतो. ज्या 20 जागा आहेत त्यानुसार कळतनकळत मुंबईकरांवर भार येणार आहे. नागरी सुविधांवर जो भार पडणार आहे, तो भार उचलणार कोण? त्याचे पैसे कोण देणार? अदानीला या जागा फुटकत देणार आहात का? त्याच्या सोयीसुविधांचं काय? पिण्याचे पाणी, सिव्हेजचं काय? या सगळ्याचा खर्च अदानी देणार आहेत का? नसेल तर अदानींना झेपत नसणारं हे काम हे टेंडर रद्द करून दुसऱ्या योग्य माणसाला ते टेंडर द्यावं. त्यासाठी तुम्ही पुन्हा ग्लोबल टेंडर मागवा. अनेक जण येतील. पण हा मुंबई उद्ध्वस्त करण्याचा डाव, धारावीकरांना उद्ध्वस्त करण्याचा डाव शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही. आता पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे, अशा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला दिला आहे.