हिंदूंची मंदिरं पाडताहेत, अत्याचार सुरू आहेत; आता विश्वगुरू कुठे आहेत? उद्धव ठाकरे यांचा खणखणीत सवाल

बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार आणि हल्ल्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत थेट पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर घणाघात केला. बांगलादेशात हिंदूंची मंदिरं जाळली जाताहेत, आपले विश्वगुरू हे अत्याचार नुसते पाहत का बसलेले आहेत? असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

संसदेत कामकाज सुरळीत सुरू आहे, हे संपूर्ण देश पाहतोय. देशाच्या महत्त्वाच्या विषयावर छान चर्चा होतेय. विरोधक आणि सत्ताधारी पक्ष देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय तिकडे मांडताहेत आणि सत्ताधारी त्याला छान उत्तर देताहेत. असं चित्र तिकडे दिसतंय, असं म्हणतात. दुर्दैवानं तसं होत नाहीये. महत्त्वाच्या विषयाला बगल देऊन नको त्या विषयावर चर्चा भरकटवली जातेय. आणि जे काही विषय मांडले जाताहेत विशेषतः हिंदुत्वाचा विषय. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होताहेत, हल्ले होताहेत. दोन-तीन महिन्यांपूर्वी बांगलादेशचा क्रिकेटसंघ हा हिंदुस्थानात आला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. जर बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असतील तर अशा देशाच्या क्रिकेट संघाबरोबर क्रिकेट खेळणं किती योग्य आहे? साहजिकच सत्ताधाऱ्यांकडून त्याला काहीच उत्तर मिळालेलं नाही. आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण हे आहे की, सातत्याने हे हल्ले सुरूच आहेत. बांगलादेशात इस्कॉनचं मंदिर जाळलंय तरीही आपण गप्प आहोत. इस्कॉनच्या तिथल्या प्रमुखांना अटक झाली तरीही आपण गप्प आहोत. हिंदूंवर रोज अत्याचार होताहेत तरी देखील आपण गप्प आहोत. मग आपले विश्वगुरू हे अत्याचार नुसते पाहत का बसलेले आहेत? तमाम हिंदूंतर्फे माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे, की जसं आपण एका फोनवर युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होताहेत त्याबद्दल काही तरी भूमिका घ्यायला पाहिजे, पावलं उचलायला पाहिजे. कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाही. जिथे काही नाहीये तिकडे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाही. पण जिथे अत्याचार होताहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत? असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

काल आमच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती. पण त्यांना ती नाकारण्यात आली. कारण मी सांगितलं होतं की, पंतप्रधानांना पत्र द्यावं. पण त्यांचे खूप व्याप आहेत. त्यांना खूप देशांमध्ये फिरायचं असतं, जगभर फिरायचं असतं, भाषणं द्यायची असतात. कदाचित त्यांच्या नजरेत बांगलादेशात होणारे हिंदूंवरचे अत्याचार लक्षात आले नसतील, जसं मणिपूरचे आले नाहीत. तसंच बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होताहेत मंदिर जाळलं जातंय. तर केंद्र सरकारने तत्काळ काय पावलं उचलणार आहे? हे स्पष्ट केलं पाहिजे. बाकिच्या चर्चा तूर्त एकदिवस बाजूला ठेवा आणि संसदेत बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल केंद्र सरकारची भूमिका काय आहे? आणि काय पावलं उचलणार आहोत हे सांगावं, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

आता सध्या भूखंड कोणाला एकालाच मिळताहेत. तर हा सिडकोचा भूखंड त्यांनाच जाणार आहेत. आणि मंदिराचा जो काही भूखंड आहे तोही त्यांनाच जाणार आहे का? गेल्या 80 वर्षांपासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालांनी बांधलेलं हनुमानाचं मंदिर त्याला भाजप सरकारने नोटीस पाठवली आहे. ती नोटीस माझ्याकडे आहे की, तुम्ही रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केलं आहे. 80 वर्षांपूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले आहेत. मग तुमचं हिंदुत्व कुठेय? कसलं हिंदुत्व आहे तुमचं? आम्हाला तुम्ही प्रश्न विचारता, तुम्ही हिंदुत्व सोडलंय का? मग तुम्ही काय सोडलेलं आहे आता? ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचवू शकता, ती तुमच्याच राजवटीत रेल्वे प्रशासन पाडतंय. तरीही केंद्र सरकार आणि राज्य सरकार ढिम्म आहे. सिडकोचा मंदिराच्या जमिनीवर डोळा आहे. बांगलादेशात मंदिर जाळलं जातंय. हिंदूंवर अत्याचार होताहेत. तरीसुद्ध गप्प बसणाऱ्याचं हिंदुत्व, नेमकी त्याची व्याख्या, त्याचा आकार उकार तरी काय? हे उत्तर त्यांच्याकडनं मिळायला पाहिजे. त्यांना आम्ही रितसर भेटीची मागणी केली होती. ती त्यांनी दिली नाही. म्हणून नाईलाजाने मला पत्रकार परिषद घेऊन त्यांना हा प्रश्न विचारावा लागतोय, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

फक्त इलेक्शन पुरताचं त्यांचं हिंदुत्व बाकी आहे का? हिंदू त्यांना फक्त नुसती मतं वाटतात, ती मतं नाहीहेत हिंदूंना भावना आहेत. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन ज्या काही गोष्टी आहेत, यांचं हिंदूत्व फक्त इलेक्शन पुरतचं मर्यादित आहे का? हिंदू राहिले फक्त मतांपुरते एवढचं त्यांचं हिंदुत्व आहे का? यांचं हिंदुत्व हे मतांपुरतं आहे. फक्त हिंदुंची मतं पाहिजेत, त्यांना भयभीत करायचं, त्यांना घाबरवायचं त्यांची मतं घ्यायची आणि आल्यानंतर स्वतःच त्यांची मंदिरं पाडायला निघाले आहेत. मग यांचं हिंदुत्व कुठेय? आता कुठे गेलं यांचं हिंदुत्व. आता मंदिरं कुठे सेफ आहेत? अगदी बांगलादेशात पण नाही आणि आपल्या मुंबईतही नाहीत. एक है तो सेफ है, मंदिरं कुठे सेफ आहेत? आपल्या मुंबईतलं जे 80 वर्षांपासूनचं हनुमानाचं मंदिर आहे, हमालांनी कष्टांनी बांधलेलं आहे, असं मंदिर पाडण्याचा फतवा निघतोय रेल्वे खात्याकडून तेव्हा फडणवीसांचं हिंदुत्व काय करतंय? भाजपचं हिंदुत्व काय करतंय? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला.