जिंकलेला असो वा पराभूत निकालांवर कोणाचाही विश्वास नाही; विधानसभा निकालांवरून उद्धव ठाकरेंचा निशाणा, आंदोलन पुढे नेण्याचा निर्धार

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी तीन दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेतले आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पैशांच्या प्रचंड वापराविरोधात त्यांनी उपोषण सुरू केले होते. बाबा आढाव यांनी आत्मक्लेश करून घेऊ नये, आम्ही आंदोलन पुढे नेऊ, असे आश्वासन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाबा आढाव यांनी दिले. त्यानंतर उद्धव ठाकारे यांच्याहस्ते त्यांनी पाणी घेत बाबा आढाव यांनी उपोषण मागे घेतले. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने हे आंदोलन राज्यभर न्यावे, अशी अपेक्षाही आढाव यांनी व्यक्त केली.

मी दसुऱ्यांदा येथे आलो आहे. आजची भेट ही आयुष्यभर लक्षात राहणारी आहे. बाबा आढाव यांना आपण पहिल्यांदाच भेटत आहोत. त्यांची भेट प्रेरणादायी आहे आणि प्रेरणा कधीहबी म्हातारी होत नाही. निवडणुका जिंकलेलेदेखील इथे येत आहेत आणि पराभूत झालेलेही येत आहेत. त्यावरून या निकालावर जिंकलेल्यांचा आणि पराभूत झालेल्यांचा कोणाचाही विश्वास नाही, हे दिसून येत आहे. आपण जिंकलो कसे, असे जिंकलेल्यांना वाटत आहे आणि आम्ही हरलो कसे असे पराभूतांना वाटत आहे. आधी सत्यमेव जयते, असे म्हणायचे. आता सत्तामेव जयते असे झाले आहे. त्याविरोधात आपण उभे ठाकलो आहोत. त्याची ही सुरुवात आहे. या आंदोलनाने काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र वणवा पेटण्यासाठी फक्त एक ठिणगी पुरेशी असते. आज ती ठिणगी पडली आहे.

निवडणुकीत पैशांचा प्रचंड वापर झाल्याचे आपण पाहिले. तसेच विनोद तावडे यांचा व्हिडीओदेखील अनेकांनी पाहिला. योजनांचा पडणारा पाऊसही आपण पाहिला. योजनांचा अनेस्थेशिया देत सरकारने त्यांचे सत्तेचे ऑपरेशन पूर्ण केले. असे अनेक मुद्दे आहेत. त्यात ईव्हीएमचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. जिंकलेले आणि पराभूत झालेले दोन्ही इथे येत आहेत. त्याला ईव्हीएम हेदखील एक कारण आहे. लोकशाहीत आपले मत कोणाला जाते, हे समजण्याचा अधिकार काढून घेतला आहे. ईव्हीएमसह व्हीव्हीपॅटच्या मतांच्या मोजणीही करण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मतदानाच्या शेवटच्या तासात 76 लाख मतं वाढली. सरासरी काढल्यास राज्यातील प्रत्येक मतदार केंद्रावर हजार लोकांची रांग असली पाहिजे. असे निर्मला सीतारमण यांचे पती प्रभाकर परकला यांनी म्हटले आहे. तसेच राक्षसी बहुमत मिळाल्यावर राज्यात आंनदोत्सव का नाही, एवढे बहुमत मिळाल्यावर शेतात पूजाअर्चा करण्यासाठी का जात आहेत. राजभवनावर जाण्याऐवजी ते शेतात का जात आहे. तसेच सत्तास्थापनेचा दावा का करण्यात येत नाही, असे सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. हम सब एक है, असे म्हणतो आता ती एकी दाखवण्याची गरज आहे. आपले मत कोणाला गेले हे समजले पाहिजे, असे वाटणारी जनता आपल्यासोबतच येणार आहे. महाराष्ट्र हा लेचापेचा नाही. हा शूरवीरांचा आहे. त्यामुळे देशाला दिशा दाखवण्यासाठी महाराष्ट्र नक्कीच पुढे येणार आहे. आता बाबा आढाव यांनी आत्मक्लेश करून घेऊ नये. हे आंदोलन आम्ही पुढे नेणार आहोत, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी बाबा आढाव यांना दिले आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. उद्धव ठाकरे यांची विनंती मान्य करत बाबा आढाव यांनी आत्मक्लेश उपोषण मागे घेतले.

यंदाच्या निवडणुकीत प्रचंड पैशांचा वापर झाला. हा पैशांचं सरकारच्या तिजोरीतून वाटप करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत काहीतरी गडबड झाली आहे. असा कोणता चमत्कार झाला, वाटप करण्यासाठी एवढा पैसा कोठून आणला, असा सवालही बाबा आढाव यांनी केला. आपण याआधीच्या सर्व निवडणुका पाहिल्या आहेत, पण या निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा अजब होता. संविधान की जय म्हणायचे आहे की, मोदी की जय म्हणायचे आहे, हे आधी ठरवा, असेही आढाव म्हणाले. लोकशाहीत आमची मते व्यक्त करणे हा आमचा अधिकार आहे. संसदेत अदानीबाबत वक्तव्य करता येत नाही. अदानी आणि यांचे काय संबंध आहेत, हे जनतेला समजलेच पाहिजे, असे बाबा आढाव म्हणाले.