शिवसेनेचे राष्ट्रपती मुर्मू यांना काळाराम मंदिरातील पूजेचे निमंत्रण

सोमनाथ मंदिराचे लोकार्पण व प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना आमंत्रित केले होते. अयोध्येतील मंदिरात केवळ प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार नाही, तर राष्ट्राच्या अस्मितेची प्राणप्रतिष्ठापना आहे. त्यामुळे अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. नाशिकच्या काळाराम मंदिरात 22 जानेवारीला शिवसेनेच्या वतीने आयोजित महापूजेसाठी राष्ट्रपती मुर्मू यांना सन्मानपूर्वक आमंत्रण देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सोमनाथांच्या मंदिराचा अनेकदा विध्वंस केला होता. पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी तेव्हा पुढाकार घेतला आणि सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण केले. जेव्हा या मंदिरात सोमनाथांची प्राणप्रतिष्ठापना झाली तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल हयात नव्हते. पण त्यावेळी या सोहळय़ासाठी देशाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना आमंत्रित करण्यात आले आणि त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्याप्रमाणे अयोध्येत होणाऱया प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळय़ाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करावे अशी शिवसेनेची मागणी असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. अयोध्येतील सोहळय़ानंतर सायंकाळी शिवसेनेच्या वतीने नाशिकच्या काळाराम मंदिरात होणारी पूजा आणि गोदातीरी होणाऱया महाआरतीसाठी राष्ट्रपती मुर्मू यांनी यावे, अशी आमची इच्छा आहे. या कार्यक्रमाचे शिवसेनेचे खासदार त्यांना सन्मानपूर्वक आमंत्रण देणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ज्याचे काम त्यांनीच करावे

अयोध्येत आम्ही फक्त टाळय़ा वाजवायला जाऊ का असे विधान शंकराचार्यांनी केल्याबाबत माध्यमांनी विचारले असता, हा त्यांचा प्रश्न आहे. कारण आपण हिंदू धर्म मानत असू तर ज्याचे काम ज्याचे त्यांनीच ते केले पाहिजे. राजकारण व नेत्यांनी बाजूला बसले पाहिजे. प्राणप्रतिष्ठापना सोहळा राष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असेल तर तो राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

गेल्या दहा वर्षांत जे दिवाळं काढलं त्यावरही चर्चा करा

पंतप्रधान मोदी यांनी 22 जानेवारीला देशात दिवाळीप्रमाणे सण साजरा करावा असे आवाहन केले आहे. याकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, त्यादिवशी दिवाळी साजरी करायला हरकत नाही. पण राम मंदिराचे निर्माण केल्यानंतर केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत देशाचे जे दिवाळे काढले आहे त्यावरही खुलेआम चर्चा झाली पाहिजे. मग ती चाय पे चर्चा करा, कॉफीवर, लस्सीवर, बिस्कीट पे चर्चा करा, फरसाण पे चर्चा करा किंवा फाफडा-ढोकळा पे… अगदी कशावरही चर्चा करा, पण चर्चा करा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

शिवसैनिकांचे मोठे योगदान

नाशिकच्या काळाराम मंदिरात होणारी पूजा आणि गोदातीरी होणाऱया महाआरतीला अयोध्येला गेलेल्या शिवसैनिकांना बोलावण्यात येणार आहे. बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात शिवसैनिकांचे मोठे योगदान आहे. त्यांना विसरता येणार नाही. त्यातील अनेक करसेवक दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत, पण सुदैवाने जे करसेवक आहेत त्यांचा तो गौरव असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावेळी शिवसैनिकांनी जर का ते धाडस केले नसते तर आजचे राम मंदिर झाले नसते. आज घुमटावर भगवे झेंडे लावायला अनेक येतात, पण जेव्हा लढण्याची वेळ येते तेव्हा आपण कुठे होतात? जे आज झेंडे लावतात त्यांच्याकडेही त्यांचे उत्तर नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

फडणवीसांना गुरूची गरज

राम मंदिर निर्माणाशी शिवसेनेचा काही संबंध नाही असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते याकडे माध्यमांनी लक्ष वेधले असता, देवेंद्र फडणवीस यांचे अज्ञान दूर करण्याचे काम माझे नाही. काही लोक अज्ञानी असतात. त्यांना गुरूची गरज आहे. त्यामुळे त्यांना चांगला गुरू मिळो अशी प्रभू रामचंद्राकडे माझी प्रार्थना आहे.

आरोपपत्रात शिवसैनिकांची नावे रेकॉर्डवर

या प्रश्नावर अधिक भाष्य करताना शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले की, शिवसेनेचे योगदान काय असा प्रश्न लोक विचारतात. पण ‘मिस्टर फडणवीस’ हे वकील आहेत, त्यांनी लखनौमध्ये जावे आणि बाबरी पाडल्यावर जे स्पेशल कोर्ट निर्माण झाले होते त्याच्या चार्जशीटमधील सर्व आरोपींची नावे पहावीत. त्यात एक हजारांपेक्षा अधिक आरोपी आहेत. त्यात जास्तीत जास्त नावे शिवसेना नेते आणि शिवसैनिकांची आहेत. हे सर्व रेकॉर्डवर आहे.

घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोलावे

नाशिकमध्ये भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाही मोडून काढण्याचे आवाहन केले. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी त्यांच्या कल्याण दौऱयाचे उदाहरण दिले. आज मी कल्याण लोकसभा मतदारसंघात जात आहे. त्यात गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याबद्दल पंतप्रधान मोदी हे बोलले नाहीत. ती घराणेशाही चालते का ? गद्दार असतील ते लोकप्रिय? त्यांची घराणेशाही प्राणप्रिय ? हा सर्व बोगसपणा आहे. घराणेशाहीबद्दल एखाद्या घरंदाज माणसाने बोलले तर बरे होईल, असा टोला मोदींना मारला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

राम मंदिरात स्वतःची मूर्ती लावू नका

राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना ? कारण ते कोणाचीही मूर्ती लावू शकतील. कारण शिवडी-न्हावा शेवा पुलाला अटल सेतू नाव दिले, पण अटलीजींचा फोटोच नव्हता. त्यामुळे राम मंदिराचे निर्माण करताना एवढी कृपा करा की, त्या मंदिरात स्वतःची नव्हे, तर प्रभू रामचंद्रांची मूर्ती लावा, असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मी कडवट हिंदुत्ववादी देशभक्त

अपूर्ण मंदिरात राममूर्तीची प्रतिष्ठापना करू नये अशी भूमिका शंकराचार्यांनी जाहीर केली आहे. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी काही पंडित नाही. शास्त्रातही जाऊ इच्छित नाही. पण कडवट हिंदुत्ववादी आहे, देशभक्त आहे. मात्र अंधभक्त नाही. देशाचा अंधभक्त आहे. राम मंदिर व्हावे ही देशातील कोटय़वधी हिंदूंची अपेक्षा आहे आहे तशीच माझीही आहे. राम मंदिराच्या योगदानामागे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व असंख्य शिवसैनिक आहेत. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी घेतलेली भूमिका जनेतला माहिती आहे. आता शास्त्रानुसार मुद्दे असतील तर मला माहिती नाही. पण काही लोकांना सवय असते की, काहीही ठोकून बोलायचे. पण मी त्यातला नाही. जर शंकराचार्यांनी त्यामध्ये शास्त्राप्रमाणे मुद्दे उपस्थित केले असतील तर त्यांनी ते पाहावे. कारण ते माझे क्षेत्र नाही. पण शंकाराचार्यांचा सल्ला घ्यावा, त्यामध्ये अंहकार ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

शिवजन्मभूमीची माती रामजन्मभूमीला गेल्यानंतर कोर्टाचा निकाल आला

राम मंदिर हा मुद्दा जेव्हा थंड बस्त्यात पडला होता तेव्हा शिवसेनेने पहिली घोषणा केली होती की, ‘पहले मंदिर-फिर सरकार’ याची आठवण यावेळी उद्धव ठाकरे यांनी करून दिली. शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यात मी अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शिवजन्मभूमीची माती मी राम जन्मभूमीला घेऊन गेलो होतो. तुम्ही माना अथवा मानू नका, पण शिवजन्मभूमीची माती मी तिकडे घेऊन गेल्यानंतर एका वर्षाच्या आत कोर्टाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे राम मंदिरात जाण्याची मला प्रेरणा येईल तेव्हा मी जाणार हे नक्की. कारण ती काही कोणाची खासगी मालमत्ता नाही. प्रभू रामचंद्र हे सर्वांचेच आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.