शिवसैनिक पूर्ण ताकदीने उतरणार महाराजांना विजयी करणारच !

महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही. कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, मराठी अस्मितेचा प्रश्न आहे, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शाहू महाराजांच्या प्रचाराला तर येणारच, विजयाच्या सभेला पण येणार, नक्कीच येणार असल्याचे वचन आपण महाराजांना दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी आज येथे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. या वेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी गळाभेट घेऊन उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, तेजस ठाकरे, महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख संजय पवार, आमदार वैभव नाईक आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या वेळी ‘कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला…’, ‘उद्धव ठाकरेसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘कोल्हापूरचा एकच आवाज… शाहू महाराज… शाहू महाराज…’ अशा घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला होता.

लढाईसाठी आशीर्वाद घेतले
नुसतं एवढे बोलून आपण थांबलेलो नाही, तर यामध्ये शाहू महाराजांकडून पुढच्या संघर्षात जे आपण सर्व जण लढत आहोत, त्याच्यामध्ये विजय मिळवण्यासाठी आशीर्वादसुद्धा घेतले आहेत. त्यांचे आशीर्वाद घेऊनच आपण पुढे निघालो आहोत. याच्यात लपवून ठेवण्यासारखे काही नाही. आमचे जे काही आहे ते जगजाहीर असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.