महाराष्ट्रद्रोही शिवद्रोही सरकार गेट आऊट ऑफ इंडिया, शिवचरणी नतमस्तक होत उद्धव ठाकरे कडाडले

मालवणच्या राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौऱ्यात जाहीर माफी मागितली. मात्र महाराजांची माफी अशी मगरुरीने मागून चालणार नाही. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान झालाय. महाराष्ट्रधर्माचा अपमान झालाय आणि महाराष्ट्र कधीही शिवरायांचा अपमान करणाऱयांना माफ करत नाही व करणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गेट वे ऑफ इंडिया येथील शिवरायांच्या पुतळय़ाच्या साक्षीने कडाडले. महाराष्ट्रद्रोह्यांना, शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय आता शांत बसू नका, असे आवाहन त्यांनी या वेळी महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी आणि नागरिकांना केले.

शिवपुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रासह देशभरातील शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप आहे. ठिकठिकाणी त्याचे तीव्र पडसाद उमटत असून भ्रष्टाचारी सरकारचा जाहीर निषेध केला जात आहे. आज महाविकास आघाडीच्या वतीनेही सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकार आणि पंतप्रधान मोदींवर तुफान हल्ला चढवला.

महाराष्ट्रात राजकारण नव्हे गजकरण…
महाविकास आघाडीच्या आंदोलनाविरुद्ध भारतीय जनता पक्ष आणि मिंधे सरकारचे लोक आज रस्त्यावर उतरले. महाविकास आघाडी शिवपुतळा दुर्घटनेचे राजकारण करतेय असे ते म्हणताहेत. पण महाराष्ट्रात सध्या जे काही वातावरण चाललेय त्याला मी तरी राजकारण म्हणायला तयार नाही. ते राजकारण नाही गजकरण आहे, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की, हल्ली राजकारण म्हणजे गजकरण झालेय. खाजवत बसताहेत. खाजवू दे त्यांना, पण शिवपुतळा निर्मितीतील चुकीला माफी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले.

आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण गेटवे ऑफ इंडिया हे ठिकाण निवडले. इथे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचे प्रवेशद्वार आहे. राज्यात घटनाबाह्य पद्धतीने बसलेल्या शिवद्रोही सरकारला आज आपण सांगू या…गेट आऊट ऑफ इंडिया, गेट आऊट असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी या वेळी केले. त्यावर गेटवे ऑफ इंडियाचा परिसर छत्रपती शिवराय आणि आई भवानीच्या जयघोषाने दुमदुला.
माफी कशासाठी मागितली, भ्रष्टाचारासाठी की तो झाकण्यासाठी?

मोदीजी, माफी कशासाठी मागितली. शिवपुतळा कोसळला म्हणून माफी मागितली? पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली की भ्रष्टाचाऱयांवर पांघरूण घालण्यासाठी मागितली? असा थेट सवालही या वेळी उद्धव ठाकरे यांनी केला. मोदी सिंधुदुर्गात केवळ निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून आले हे सर्वांना माहीत होते. नौदल दिन प्रथमच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सिंधुदुर्गात दिमाखदारपणे साजरा होतोय याचा आम्हाला अभिमान वाटला होता. पण त्याच वेळी घाईघाईने भ्रष्टाचार करून महाराजांचा पुतळा बसवण्याची गरज नव्हती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदीजी, कुणाकुणाची माफी मागणार?

निवडणुकीच्या वेळी मोदी म्हणत होते की, ही मोदी गॅरंटी आहे. जिथे हात लावीन तिथे सत्यानाश होईल हीच मोदी गॅरंटी आहे का? याचा पुनरूच्चारही या वेळी उद्धव ठाकरे यांनी केला. मोदी कुणाकुणाची माफी मागणार. महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळला त्यासाठी माफी मागणार? निवडणुकीसाठी घाईगडबडीने अयोध्येत राममंदिर उभे केलेय ते गळतेय म्हणून मागणार? घाईघाईने संसद भवन उभारलेय ते गळतेय म्हणून मागणार? की दिल्लीच्या विमानतळाचे छत कोसळलेय, पूल कोसळताहेत त्यासाठी माफी मागणार? अशी प्रश्नांची सरबत्तीच उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवरायांच्या अपमानाला माफी नाही

महामहीम राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांनी कोलकात्यातील अत्याचाराच्या घटनेबद्दल म्हटले होते की, आता बस झाले. मोदींनाही देशाने निवडून दिले ही कदाचित एक चूक घडली असेल, पण महाराजांची माफी अशी मगरुरीने मागून चालणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी निक्षून सांगितले. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे. शिवपुतळा कोसळणे हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान आहे. हा महाराष्ट्रधर्माचा अपमान आहे आणि शिवरायांचा अपमान करणाऱयांना महाराष्ट्र कधीही माफ करत नाही आणि करणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.

…तर मोदींना महाराष्ट्राने शिल्लक ठेवले असते का?

उद्धव ठाकरे यांनी या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही तोफ डागली. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले होते. त्यांनी माफी मागितली. माफी मागितली नसती तर त्यांना महाराष्ट्राने शिल्लक तरी ठेवले असते काय. पण ती माफी मागताना मोदींच्या चेहऱयावर जी मगरुरी होती ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थित तमाम शिवप्रेमींनी ‘नाही, अजिबात नाही…’ असा गगनभेदी प्रतिसाद दिला. मोदीजी, माफी मागताना नतमस्तक हे केवळ शब्दात आम्हाला मंजूर नाही. मगरुरीने माफी आम्हाला मान्य नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.