अमित शहा हे अहमदशाह अब्दालीचे राजकीय वारस; उद्धव ठाकरे यांनी आसूड ओढला

भाजप नेते अमित शहा हे अहदमशाह अब्दालीचे राजकीय वारस आहेत, अशी खरमरीत टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. विधानसभा निवडणुकीत यांच्या पाठीवर इतके वळ द्या की यांची वळवळ थांबली पाहिजे. औरंगजेबाला जसे इथे गाडले तसेच त्यांनाही इथे गाडा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले. पुण्यात झालेल्या शिवसेना शिवसंकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, उपनेते शशिकांत सुतार, उपनेत्या सुषमा अंधारे, उपनेते जिल्हासंपर्कप्रमुख सचिन अहिर आणि सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मला पुण्यात जाहीरसभा घ्यायची होती, कारण आता जाहीर लढाई मैदानातच होणार हॉलमध्ये नाही. मुंबईच्या शिवसैनिकांना म्हणालो त्या प्रमाणे एक तर तू राहशील किंवा मी राहीन. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे. मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडा टाकणाऱ्यांचा दरोडेखोरांचा पक्ष जो आहे तो आख्खा पक्ष. ढेकणांना कधी आव्हानं द्यायची नसतात, ढेकणं अंगठ्यांनी चिरडायची असतात. त्यामुळे कुणाला तरी वाटलं त्यालाच बोललोय. ते म्हणाले की माझ्या नादाला लागू नका. तुझ्या नादाला लागायला तु त्या कुवतीचा नाहीच, असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

चला जिंकूया… बोलायला खूप सोपं आहे. पण कसं जिंकायचं आणि कशासाठी जिंकायचं हा महत्त्वाचा विचार आहे. कसं जिंकायचं हे सांगितलं गेलंय आणि कशासाठी जिंकायचं आहे याचा अनुभव तुम्हाला लोकांना येत आहे. पुढचं भाषण सुरू करण्याच्या आधी पुणेकरांचा महत्त्वाचा विषय आहे. रिव्हर फ्रंट या विषयामध्ये अभ्यास करणारे काही पर्यावरणवादी आहेत, त्यांची माझी काल भेट झाली. आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना पाहिजे गेल्या काही दिवसांपूर्वी जो पुण्यात पूर आला होता, हा केवळ एका विभागाचा पूर नाहिये. काही हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. पाऊस आला, पूर आला. तसं मागे पानशेतचं धरण फुटल होतं. या गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण देशात मग वायनाड असेल, केदारनाथ असेल बऱ्याच ठिकाणी पूर येत आहे. भूस्खलन होत आहे. आणि हे आपण फक्त निसर्गावर टाकून नाही चालणार, काही गोष्टीत आपण चुकत आहोत. मी चुकत नाही म्हणत गुन्हे घडत आहेत. या गुन्हेगारांना लटकवण्यासाठी आपण जिंकलं पाहिजे. फासावर तर नाही उलटं लटकवलंच पाहिजे. आणि मी सर्वांना विनंती करेन खासकरून पुणेकरांना की अख्खा हा विषय पुणेकरांचा आहे. एक विकासाचं स्वप्न दाखवणं वेगळे. इथे जॉगिंग ट्रॅक होईल, इथे सायकलिंग ट्रॅक होईल, हे बरोबर आहे. पण त्याच्यासाठी आपल्या शहराची काय हानी होणार आहे, ते सुद्धा बघा. आणि मी तुम्हाला फक्त दोन फोटो दाखवणार आहे. हा पहिला फोटो गुगल मॅपचा, मुंबईत जसा पूर आला होता काही ठिकाणी त्याची उपाययोजना केली, तरी देखील वेगळ्या ठिकाणी पाणी तुंबलं. कारण मुंबईत चाललेली बेसुमार, नियोजनशून्य मेट्रोची कामं. अनेक ठिकाणी मुंबईकरांच्या पाण्यात गटाराचं पाणी मिक्स होत आहे. पोटाचे विकार होत आहेत. तसंच पुण्यामध्ये मुळा मुठा आहे. काही वर्षांपूर्वी व्यंकय्या नायडू आले होते. आणि त्यांनी नदीचं नाव विचारलं. त्यांना कुणीतरी सांगितलं मुळा मुठा. तर ते म्हणाले ही काय नावं आहेत. नावं कशी पाहिजेत? नदीचं नाव व्यंकय्या ठेवायचं काय? की मोदींचं नाव द्यायचं मोदी नदी. सगळीकडे मोदी मोदी चाललंय. पण त्यांनी सांगितलं नदींची नावं बदला. नावं तर ते बदलूच शकत नाहीत. पण ते नद्यांचे प्रवाह बदलायला लागले. एका नदीच्या प्रवाहात नाईक बेट आहे. पुणेकरांना माहित असेल, भर टाकण्यापूर्वीचा हा नाईक बेटाचा फोटो आहे. दोन्ही बाजूने तिथे नदीचा प्रवाह जातोय. नाईक बेटाच्या एका बाजूला भराव टाकून प्रवाहच बंद केला. मग नदी इकडे तिकडे घुसणार नाही का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

का जिंकायचं? कारण मला पुणं वाचवायचं आहे. मला पुण्याचा शाश्वत विकास करायचा आहे. आजपर्यंत कधीही मुख्यमंत्री असताना पुण्याच्या विकासात दखल घेतली नव्हती, कारण इथले सुभेदार बसले होते. म्हटलं तुम्ही पुण्याचं चांगभलं करत असाल तर करा. आणि आपल्या सत्तेच्या काळात ज्या गोष्टींना आपण स्टे दिला होता, आपलं सरकार गद्दारी केल्यानंतर पाडल्यानंतर पुन्हा जोमाने लाखो ट्रक डेब्रिज टाकून नदीचा प्रवाह बंद करून टाकला. आणि पुराचं पाणी पुणेकरांच्या घरात घुसायला लागलं. याला विकास म्हणायचा? हा विकास नाही विकार आहे. हा भाजपला झालेला विकार आहे. आणि यासाठी पुणेकरांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. आपण जर उतरलो ना एक तर मी राहीन किंवा तू, कुणासाठी राहीन तू तर बरबादी करणारा तुला घालवण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे. हे बेट कुणाचं आहे, तिथे भराव कोण टाकतंय? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी केला.

माझ्या माहितीप्रमाणे राम मंदिर गळतंय, तसंच नवीन संसद भवनही गळतंय. हे संसद भवन ज्यानी बांधलं तोच कोन्ट्रॅक्टर नदी बुजवण्याचं काम करतोय, ही माझी माहिती आहे. गुजरातचाच आहे, औरंगजेबाच्या राज्यातच जन्मलेला आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका, पैसे गेले तरी चालतील जाऊ दे, पण माझ्या कॉन्ट्रॅक्टरची तुंबडी भरली पाहिजे. पुणेकर मेला तरी चालेल. पण नदी बंद झालीच पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात पैसा पडलाच पाहिजे. या कॉन्ट्रॅक्टर्सना मी सुद्धा सांगतोय, तीन महिने थांबा मी हिशेब चुकता करायला येतोय. संसद भवन उघडून एकच वर्ष झाले. मोदी जे काँग्रेसकडे हिशेब मागत आहेत, साठ साल मे क्या किया, सत्तर साल मे क्या किया? बारा महिन्यांत तुम्ही जे संसद भवन बांधलं ते गळतंय, आधी त्याचा हिशेब द्या. मग आमच्या सत्तर वर्षांचा हिशेब मांडा. संसद भवन गळतंय, राम मंदिर गळतंय, पेपर लीक होतोय, हे गळती सरकार नाही तर काय म्हणणार? मी पुणेकरांना विचारतोय 10 वर्षांपूर्वी जे पुणं होतं, त्यात आमचंही पाप होतं. त्यांना आम्ही पाठिंबा दिला होता, हिंदुत्वाच्या वेडापायी दिला होता. 10 वर्षांपूर्वीचं पुणं चांगलं होतं की आता बट्याबोळ झालेलं पुणं चांगलं होतं? याचं उत्तर द्या, मग तू तरी राहशील किंवा मी तर राहीन, आता होऊनच जाऊ दे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

आता तुम्ही म्हणालात खड्ड्यांचं पुणं झालंय. सगळीकडे खड्डेच खड्डे, मुंबईत सुद्धा खड्डेच खड्डे. म्हणजे नितीन गडकरी जे सांगत होते, की असे रस्ते मी बनवेन त्यात 200 वर्षे खड्डेच पडणार नाहीत. अजूनही मुंबई-गोवा हायवे झालेला नाही. कोकणात गचके खाउनच जावं लागतं. गणपतीचा सीजन आला तर नाटकं सुरू होतात, राजकारणी खड्डे बघायला जातात. जे सगळे खड्डे आहेत त्याचा फोटो तयार करा आणि जसं युगपुरूष असतं, तसा खड्डा पुरूष म्हणून त्यांना पुरस्कार द्या, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

इतिहासामध्ये आपण जर डोकावलं तर शाहिस्तेखानाचं तीन बोटावर निभावलं. पुण्यात त्याची तीन बोटं गेली आणि शाहिस्तेखान पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. त्यातला काही शहाणपणा त्यांनी घेतला असता तर हे परत आले नसते. पण हे परत आले कशासाठी? महाराष्ट्राने जे फटके दिले, त्याचे वळ कुणाकुणाच्या अंगावर कसे उमटले ते बघण्यासाठी आले होते. आणि त्यांचे म्होरके अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा. अहमदशाह अब्दाली तो पण शहा होता. तो अहमदशाह होता हे अमित शहा आहेत. अहमदशहा अब्दालीचा हा राजकीय वंशज इकडे वळवळायला आला होता. आम्हाला हिंदुत्व शिकवताय. अरे नवाज शरीफचा केक खाणारी अवलाद तुमची, तुमच्याकडून हिंदुत्व शिकायचं ? शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, का आम्ही हिंदुत्व सोडू? कशासाठी सोडू? शंकराचार्य म्हणाले की विश्वासघात करनेवाला हिंदू नही हो सकता. तुम्ही आमच्याशी विश्वासघात केला. शंकराचार्य म्हणाले की जो विश्वासघात करतो तो हिंदु नाही. मग तुम्ही आमचा विश्वासघात केल्यानंतर तुम्ही हिंदू आहात की नाहीत? असे उद्धव ठाकरे म्हणाले.

1940 सालापासून तुमचे पूर्वज बघा. मुस्लिम लीगने फाळणी मागितली होती, तेव्हा बंगालमध्ये मुस्लिम लीगसोबत मांडीला मांडी लावून बसणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी. मेहबूबा मुफ्तीसोबत युती करणारी ही भाजपा. आजसुद्धा चंद्राबाबू नायडू हा हिंदुत्ववादी माणूस आहे? नितीश कुमार हे हिंदुत्वावादी आहेत? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

आता आणखी एक त्यांनी काढलं आहे. हिंदु मुलगी आणि मुस्लिम मुलाचं काही झालं तर लव्ह जिहाद. तसं तर तुम्ही बेशरमपणाने सत्तेसाठी सरकारमध्ये माणसं फोडताहेत, पक्ष फोडताहेत. पक्ष चोरताय. हा तुमचा सत्ता जिहाद नाही का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. अमित शहांना ऐकवण्यासाठी काही कागद घेऊन आलोय. ज्या वेळेला आणीबाणी होती त्या आणीबाणीच्या काळात अनेकांना तुरुंगात टाकलं होतं. सरदार पटेल यांच्यानंतर इंदिरा गांधी यांनी संघावर बंदी घातली होती. तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस हे येरवडा तुरुंगात होते. देवरसांची पुस्तकं काढा त्यात आहे. ती पत्र वाचल्यानंतर कळेल संघाचा आणीबाणीला पाठिंबा होता की नाही? पण देवरसांनी दोन पत्र तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पाठवली होती. आणि संघ कसा आहे, त्यात त्यांनी सांगितलं होतं. त्या पत्रात म्हटलं होतं की संघावर सांप्रदायिक असल्याचा आरोप करणारेही लोक आहेत. पण त्यांचे हे आरोप निराधार आहेत. संघाचे कार्यक्षेत्र हे हिंदूंपूरतेच आहे, तरी कुठल्याही बिगरहिंदूंविरोधात संघात शिकवले जात नाही. संघात मुस्लिमांचा द्वेष केला जातो हे ही चुकीचे आहे. इस्लाम धर्म, मोहम्मद पैंगबर, कुराण, ख्रिश्चन धर्म, येशु ख्रिस्त, बायबल यांच्या संबंधित संघात चुकीचं शिकवलं जात नाही. इतकंच नाही तर सर्वधर्मसमभाव संघ मानतो. हा कुणाचा फॅन क्लब आहे? असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. पुढच्या पाच पन्नास वर्षांत नक्की निकाल लागेल. पण तो निकाल लागायचा तेव्हा लागेल. मी जनतेच्या न्यायालयातला न्याय मागायला आलोय. मशाल आता घरोघरी घेऊन जायची आहे. काही शाखांवर आजही धनुष्यबाण आहे. मला आता तिथे मशाल पाहिजे आहे. ही मशाल फक्त बोर्डावर नाही तर प्रत्येकाच्या हृदयात धगधगती राहिली पाहिजे. विधानसभा निवडणुकीत अहमदशाह अब्दालीच्या पाठीवर एवढे वळ आले पाहिजे की यांची वळवळ कायमची थांबली पाहिजे, यासाठी हातात मशाल घ्या आणि जशी या औरंगजेबाची कबर इथे महाराष्ट्रात बांधली तशी यांची कबर इथेच बांधा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.