देवेंद्रजी, तुम्हाला जनता सांगतेय, गेट आऊट सून! उद्धव ठाकरे यांचा गृहमंत्री फडणवीसांवर पलटवार

राज्यात राजकीय हत्यासत्रांबद्दल आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाब मागितला तर ते म्हणताहेत की, उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, गेट वेल सून उद्धव ठाकरे… ठीक आहे, तुम्ही मला गेट वेल सून म्हणता. पण ही महाराष्ट्राची जनता तुम्हाला म्हणते आहे, देवेंद्रजी, गेट आऊट सून… गेट आऊट. तुमच्या एवढा नालायक आणि निर्दयी गृहमंत्री आम्ही कधी पाहिला नव्हता, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शनिवारी शाखाभेटीदरम्यान चेंबूरमधील अणुशक्तीनगर विधानसभा, वाशीनाका येथील शाखा क्र. 147 आणि चेंबूर-ट्रॉम्बे येथील लालडोंगर शाखा क्र. 155 येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय हत्याकांडावर भाष्य करत मिंधे सरकारला जाब विचारला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन शिवसैनिक तसेच स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, शिवसेना नेते आमदार अनिल परब, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे उपस्थित होते. विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांनी स्थानिक पदाधिकाऱयांबरोबर या निष्ठावंत शिवसैनिक संवाद कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.

यावेळी शिवसेना उपनेते सुबोध आचार्य, सचिव सुप्रदा फातर्पेकर, आमदार प्रकाश फातर्पेकर, विभाग संघटक पद्मावती शिंदे, निधी शिंदे, अंजली नाईक, ऋतुजा तारी, अनिल पाटणकर, श्रीकांत शेटये, विधानसभा संघटक महेंद्र नाकटे, निमिष भोसले, संजय नटे, उपविभागप्रमुख राजेंद्र पोळ, सुरेश लांडगे, प्रशांत म्हात्रे, किरण लोहार, शाखाप्रमुख अशोक वीर, सचिन भोसले, विजय नागावकर, अविनाश शेवाळे उपस्थित होते.

सिंधुदुर्गात आलेला पाणबुडी प्रकल्प गुजरातला घेऊन गेले!
मोदीजी 19 तारखेला मुंबईत येत आहेत. ते कशाला येत आहेत? या आधीही ते महाराष्ट्रात नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्गमध्ये येऊन गेले. सिंधुदुर्ग किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकमेव मंदिरात जाऊन ते नतमस्तक झाले आणि त्यांनी पुढे केले काय तर सिंधुदुर्गमध्ये होणारा पाणबुडी प्रकल्प ते गुजरातला घेऊन गेले.

मुंबई आमची आई, तिला लुटू देणार नाही!
मुंबई आणि महाराष्ट्राला लुटणाऱयांना आपल्याला रोखायचे आहे. सगळे काही गुजरातला घेऊन जात आहेत. आपले गुजरातशी, गुजरातच्या जनतेशी वैर नाही. मात्र, मुंबई आणि महाराष्ट्राचे वैभव ओरबाडून जे दिल्लीश्वर गुजरातला घेऊन जात आहेत. त्याला आम्ही विरोध करणार आणि करणारच. महाराष्ट्र, मुंबई आमची आई आहे. तिला लुटू देणार नाही. जे नतद्रष्ट आहेत त्यांना आम्ही गाडणारच. गाडलेच पाहिजे.

पालिका, मुंबईकरांच्या हक्काच्या पैशातून कोस्टल रोड प्रकल्प पूर्ण
मुंबई महापालिका आणि मुंबईकरांच्या हक्काच्या पैशातून कोस्टल रोड (सागरी मार्ग) बांधण्यात आला आहे. त्यासाठी राज्य आणि पेंद्र सरकारकडून एक पैसाही आला नाही. आता हे स्वप्न पूर्ण होतेय. हे स्वप्न पूर्ण झालेले नाही. वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंतचा दक्षिणेकडील मार्ग पूर्ण झाला आहे. त्या अर्धवट मार्गाच्या उद्घाटनासाठी मोदीजी मुंबईत येत आहेत.

जे बोलतो, ते करून दाखवतो!
प्रियदर्शनी पार्क ते वरळी या साडेदहा किलोमीटर सागरी मार्गाचे भूमिपूजन मी केले होते. हा मार्ग वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी कोरोना काळातही कर्मचाऱयांनी दिवसरात्र काम केले. कोस्टल रोडचे काम शिवसेनेने केले, उद्घाटन मोदीजी करताहेत. यातून एकच कळते की, उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो, याचा हा पुरावा, याची साक्ष खुद्द मोदीजी देतील. ते म्हणतील ‘उद्धव ने बोला था, कर के दिखाया है। मैने तो केवल उद्घाटन किया है।’

त्या रस्त्यांची आता काय अवस्था आहे?
मोदीजींना माझी विनंती आहे की, तुमच्या आजूबाजूला जे चेले-चपाटे गद्दार फिरत आहेत त्यांना विचारा की, ज्या रस्त्यांचे भूमिपूजन तुम्ही गेल्या वर्षी केले होते त्या रस्त्यांची आता काय अवस्था आहे, किती रस्त्यांच्या कामात घोटाळे झाल्यामुळे पुन्हा निविदा काढाव्या लागल्या, किती रस्त्याची कामे पूर्ण झाली, आम्ही कोरोना काळात न थकता कोस्टल रोडचे काम पूर्ण केले म्हणून तुम्ही उद्घाटन करत आहात.