उद्धव ठाकरे यांचा विदर्भ-मराठवाडा दौरा रद्द, मुंबईकडे रवाना

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नियोजित विदर्भ-मराठवाडा दौरा रद्द करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत या दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते मुंबईकडे रवाना झाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय बुलढाणा दौऱ्यावर होते. गुरुवारी त्यांच्या सभाही येथे पार पडल्या. आजही त्यांचे नियोजित कार्यक्रम आणि सभा होत्या. मात्र मनोहर जोशी यांच्या निधनाची बातमी समजताच उद्धव ठाकरे यांनी आपला नियोजित दौरा रद्द केला. ते मुंबईकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

“पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आम्ही मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शेवगाव येथे आम्हाला ही दु:खद बातमी समजली. त्यानंतर हा दौरा थांबवून आम्ही मुंबईकडे रवाना होत आहोत. दुपारी मनोहर जोशी यांची अंत्ययात्रा निघणार असून आम्ही त्यात सहभागी होऊ”, अशीही माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

शून्यातून विश्व निर्माण करणारे मनोहर जोशी लढवय्ये, कडवट शिवसैनिक होते! – संजय राऊत

दरम्यान, मनोहर जोशी यांचे पार्थिव हिंदुजा रुग्णालयातून सकाळी 9 वाजता माटुंगा येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते 2 या दरम्यान अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी दोननंतर अंत्ययात्रा सुरू होईल आणि दादर स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला! – नितीन गडकरी