उद्धव ठाकरे यांचा झंझावात विदर्भ, मराठवाड्यात

लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जनसंवादाचा झंझावात सुरू आहे. उद्यापासून दोन दिवस उद्धव ठाकरे विदर्भातील बुलढाणा आणि मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या दौर्‍यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य पसरले आहे.

भाजप देशाला हुकूमशाहीकडे नेत आहे. लोकशाही आणि संविधान संकटात आहे. दिवसाढवळ्या पक्ष चोरले जात आहेत. लोकांनी निवडून दिलेल्या सरकारांचे अपहरण केले जात आहे. त्याविरोधात लढाईची हाक देत उद्धव ठाकरे थेट जनतेच्या न्यायालयात उतरले आहेत. कल्याण, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघांत झंझावाती जनसंवाद दौरा केल्यानंतर उद्धव ठाकरे आता बुलढाणा आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. उद्या चिखली, मोताळा, जळगाव जामोद येथे, तर शुक्रवार, 23 फेब्रुवारी रोजी खामगाव, मेहकर, सेनगाव, कळमनुरी येथे उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत.

गुरुवार
चिखली : दुपारी 2 वा.
मोताळा : दुपारी 4.30 वा.
जळगाव जामोद : सायंकाळी 6.30 वा.

शुक्रवार 
खामगाव : सकाळी 11 वा.
मेहकर : दुपारी 2 वा.
सेनगाव : सायंकाळी 4.15 वा.
कळमनुरी : सायंकाळी 6.15  वा.

विदर्भ तसेच मराठवाड्यात होणार्‍या जनसंवाद मेळाव्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आदींची उपस्थिती असणार आहे.