महाराष्ट्र मोदी – शहांच्या गुलामांची वसाहत झालीय, खोके सरकार घालवावंच लागेल! उद्धव ठाकरे यांचा पत्रकार परिषदेत घणाघात

महाराष्ट्रधर्म बुडवणाऱ्या, महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातच्या चरणी अर्पण करणाऱ्या महाराष्ट्रद्वेष्ट्या गद्दारांचा पंचनामा आज महाविकास आघाडीने प्रसिद्ध केला. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा आणि फुले-शाहू-आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या गद्दारांना महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा संकल्प यावेळी केला गेला. महाराष्ट्र मोदी-शहांच्या गुलामांची वसाहत झालीय, खोके सरकार घालवावंच लागेल, असा घणाघात यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

वांद्रे पश्चिम येथील हॉटेल ताज लँडस एण्डमध्ये महाविकास आघाडीची आज बैठक झाली. बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राज्यातील महाभ्रष्ट युती सरकारच्या काळ्या कारभाराचा ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकारचा नाकर्तेपणा, भ्रष्टाचार आणि ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर जोरदार प्रहार केला. आमदार बाबा सिद्दिकींची हत्या होईपर्यंत यंत्रणा काय करत होत्या? असा सवाल त्यांनी केला. मुंबईला दोन पोलीस कमिशनर आहेत, आणखी पाच वाढवा, जे जे लाडके असतील त्यांना कमिशनर करा पण सुरक्षेचे काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजधानीत जर हत्या होत असेल, महिलांवर अत्याचार होत असतील तर राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे कुठे? शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. त्यावेळी गृहमंत्री म्हणून जबाबदारी न स्वीकारता, “गाडीखाली कुत्रे आले तरी विरोधक गृहमंत्र्याचा राजीनामा मागतील’’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. सामान्यांच्या जिवाची तुलना कुत्र्यांशी करता मग तुम्ही राज्यकर्ते म्हणून राहायच्या लायकीचे नाहीत, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

जनतेचा सरकारवरील विश्वास उडालाय

सिद्दिकींच्या हत्येनंतर झालेल्या अटका असोत वा अक्षय शिंदेचे एन्काऊंटर, हे खरंय की खोटं आहे असा संशय सरकारच्या प्रत्येक कृतीबद्दल लोक व्यक्त करत आहेत ही गंभीर बाब आहे. सरकारवरचा विश्वास उडाला आहे. हेच सरकारचे अपयश आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मिंधे सरकार विरोधकांविरुद्ध ईडी, सीबीआय वापरतेय, पण गुन्हेगार मात्र मोकाट आहेत, असेही ते म्हणाले.

आधी महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर होऊ द्या, मग आमचा जाहीर करू

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असे यावेळी माध्यमांनी विचारले असता, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत महाविकास आघाडीमध्ये एकमत आहे, असे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी सांगितले. भाजपवाले चोर गद्दारांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार आहेत का हे समोर येऊ दे. त्यांचा चेहरा जाहीर झाला रे झाला की नंतर आम्ही आमचा चेहरा जाहीर करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पटोले यांनीही त्याला दुजोरा दिला तर महाविकास आघाडीत खुर्चीसाठी वाद नाहीत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात मोदी फॅक्टर चालणार नाही

हरयाणाच्या निकालासंदर्भातील प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, हरयाणाबरोबर कश्मीरचाही निकाल लागला आहे. तेथील 370 कलम भाजपने रद्द केले, इतरही गोष्टी केल्या मग कश्मीरमध्ये सर्वात जास्त जागा भाजपच्या यायला हव्या होत्या. त्या का आल्या नाहीत. कारण प्रत्येक राज्याचे गणित वेगवेगळे आहे. महाराष्ट्रात मोदी फॅक्टर आहे का अशा प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात मोदी चालत नाही, इथे फक्त महाराष्ट्राचा ट्रक्टर चालणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

गद्दारांनी काय केले? असा आहे पंचनामा…

  • महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार
  • फुले-शाहू-आंबेडकरांचा अपमान
  • महाराष्ट्रात महिला, लेकीबाळी असुरक्षित
  • निर्भया फंडाच्या पैशातून आमदारांना आलिशान गाड्या
  • हमीभाव अन् पीक विमाही नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या
  • जलयुक्त शिवारवर दहा हजार कोटी खर्चूनही पाणीटंचाई
  • महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून लाखो युवकांचा रोजगार हिरावला
  • गाडीखाली गरीबांना चिरडणारे श्रीमंत मोकाट
  • महाराष्ट्राची तिजोरी लुटून प्रत्येक कामात 30 टक्के कमिशनखोरी
  • पेपर फोडले… कंत्राटी भरती केली…
  • पेट्रोल-डिझेल-गॅस, तेल-तिखट-मीठ महाग करून सामान्य जनतेचे कंबरडे मोडल
  • आदिवासी, मागासवर्गीयांना उद्ध्वस्त करून त्यांच्या मुलांची उपासमार केली
  • उद्योगपतींच्या फायद्यासाठी वाढवण बंदर निर्मिती करून मच्छीमार बांधवांचा व्यवसाय उद्ध्वस्त केल
  • मराठवाड्याला दुष्काळाच्या खाईत लोटले
  • जाती-धर्मात भांडणे लावून महाराष्ट्रात दंगली घडवल्या
  • राज्यातील शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर

जनतेनेच मिंधे सरकारला घरी पाठवावे

मिंधे सरकारकडून जाहिरातींवर केल्या जाणाऱ्या उधळपट्टीवरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. तो पैसा जनतेच्या सुरक्षेवर का लावत नाही, असे ते म्हणाले. गद्दारांचा पंचनामा म्हणून हे आरोपपत्र आम्ही जनतेच्या न्यायालयात मांडत आहोत. जनतेसाठी, महाराष्ट्रासाठी आम्ही लढत राहू, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले. जनतेनेच आता या सरकारला घरी पाठवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रशासन व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या हातून महाराष्ट्र वाचवावा लागेल – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राच्या प्रशासनाचा देशात लौकिक होता, पण महायुती सरकारच्या काळात ही प्रशासकीय व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, प्रशासन व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या हातून महाराष्ट्र वाचवावा लागेल आणि त्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. फडणवीसांना सत्तात्याग करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे ते म्हणाले. सत्तेत परिवर्तन करून घेणे हाच पर्याय महाराष्ट्रासमोर असल्याचे ते म्हणाले.

गुजरातधार्जिण्या महायुतीला सत्तेतून बाहेर खेचणार – नाना पटोले

गुजरातधार्जिण्या महायुती सरकारला सत्तेतून बाहेर खेचणे हेच महाविकास आघाडीचे लक्ष्य आहे, असे याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. शाळेतील मुली सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत. राज्यातली जनता सुरक्षित नाही आणि आता तर सत्तेतील लोकही सुरक्षित नाहीत. माजी मंत्री, आमदार बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. आता महायुतीच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले जाणार नाहीत तर जनताच यांना सत्तेतून खाली खेचेल, असे पटोले म्हणाले. राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्ष त्यांच्या विचारांच्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदावर बसवून लोकशाहीचा खून करण्याचे काम करत आहे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला हे त्याचेच एक उदाहरण आहे, असे ते म्हणाले.