मुंबई विमानतळावर वन्यजीवांची तस्करी करणारे रॅकेट उद्धवस्त, दोघा आरोपींना अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वन्यप्राण्यांची तस्करीचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) ने ही कारवाई केली. मोहम्मद रेहान मदनी अजमेरी आणि हमजा युसूफ मन्सुरी अशी आरोपींची नावे आहेत. दोघा आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी अधिकाऱ्यांनी अर्जाद्वारे केली आहे.

मोहम्मद अजमेरी हा 27 सप्टेंबर रोजी विस्तारा फ्लाईटने बँकॉकहून मुंबईत आला. विमानतळावर तपासणी दरम्यान त्याची झडती घेतली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. मात्र त्याच्या सामानाची तपासणी घेत असताना अधिकाऱ्यांना त्याच्या ट्रॉली बॅगमध्ये सर्जिकल मास्क बॉक्समध्ये दोन जिवंत मगरीची पिल्लं आढळून आली.

अधिकाऱ्यांकडून अजमेरीची चौकशी सुरू असतानाच त्याला एक कॉल आला. यामुळे तपास अधिकाऱ्यांचा संशय अधिक बळावला. पोलिसांनी कॉल करणारा अजमेरीचा सहप्रवाशी हमजा मन्सुरीला विमानतळाबाहेरून ताब्यात घेतले. मन्सुरीच्या सामानाची झडती घेतली असता त्यात आणखी तीन पिल्लं सर्जिकल बॉक्समध्ये आढळून आली.

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो (WCCB) शी संपर्क साधला. WCCB च्या अधिकाऱ्यांनी सदर प्राणी ज्युवेलियन केमन मगर (कैमन क्रोकोडायलस क्रोकोडायलस) होते. योग्य परवानग्यांशिवाय या प्रजातींची आयात करणे हे डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) नियमांचे आणि वन्य जीवजंतू आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशनाचे (CITES) उल्लंघन आहे.

1962 च्या सीमाशुल्क कायद्यांतर्गत, दोन आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना एस्प्लानेड न्यायालयात हजर करण्यात आले. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी आता वन्यजीव तस्करीच्या कारवाईचा तपास सुरू ठेवण्यासाठी आरोपींना 24 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची विनंती केली आहे.