मोखाड्यातील दोन हजार कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ मिळालाच नाही; ऐन गणेशोत्सवात मिंधे सरकारने फसवले

मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या ‘आनंदाचा शिधा’ योजनेला यंदाच्या गणेशोत्सवाला मिंधे सरकारने कात्री लावली आहे. राज्यातील लाभार्थी संख्येएवढे किट न देता अपूर्ण किटचा पुरवठा स्वस्त धान्य दुकानांना केला आहे. त्यामुळे मोखाडा तालुक्यात सुमारे 1 हजार 935 आदिवासी कुटुंबांना या शिध्यापासून वंचित राहावे लागले आहे. मिंधे सरकारने फसवणूक केल्याने गोडाधोडाचे पदार्थ न करताच लाडक्या बहिणींना गणेशोत्सव साजरा करावा लागत आहे.

गणेशोत्सव सुरू झाला तरी मिंधे सरकारने लाभार्थी कुटुंबांच्या संख्येएवढा ‘आनंदाचा शिधा’चा पुरवठा न केल्याने हजारो कुटुंब या शिध्यापासून वंचित आहेत. मोखाडा तालुक्यात 64 स्वस्त धान्य दुकाने आहेत. तालुक्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब अशी एकूण १९ हजार ८३ लाभार्थी कुटुंब संख्या आहे. यामध्ये अंत्योदयचे ४८ हजार ७४५ तर प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक ४२ हजार ८८७ असे एकूण ९१ हजार ६३२ लाभार्थी संख्या आहे. ऑनलाइन नोंदणीप्रमाणे मोखाड्यात १८ हजार ६९० कुटुंबे आनंदाचा शिधा योजनेसाठी पात्र आहेत. मात्र शासनाकडून तालुक्याला १६ हजार ७५५ ‘आनंदाचा शिधा’चे किट उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सुमारे १ हजार ९३५ लाभार्थी कुटुंब ‘आनंदाचा शिधा’ पासून वंचित राहणार आहेत. एकट्या मोखाडा तालुका अथवा पालघर जिल्ह्यात सर्वत्र अशीच स्थिती आहे.

दुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये खटके
तालुक्यातील ६४ स्वस्त धान्य दुकानात ५० टक्केच ‘आनंदाचा शिधा’चे किट वाटप करण्यात आले आहे. किट न मिळाल्याने लाभार्थी आणि दुकानदारांमध्ये खटके उडत आहेत. दरम्यान, शासनाकडून १ हजार ९३५ ‘आनंदाचा शिधा’च्या किटचा पुरवठा कमी झाला आहे. उर्वरित किट मिळावे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पुन्हा मागणी केल्याची माहिती पुरवठा अधिकारी उपेंद्र देशमुख यांनी दिली.

काय आहे किटमध्ये ?
गरीब कुटुंबांना केवळ १०० रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, साखर, पामतेल आणि चणाडाळीचे किट स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना दिले जात आहे.