Jammu Kashmir – हिंदुस्थान-पाकिस्तान सीमारेषेवर धुमश्चक्री, 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी उधळून लावला आहे. रविवारी मध्यरात्री हिंदुस्थान-पाकिस्तान सीमारेषेवर सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये उडालेल्या या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. लष्कराने अधिकृतरित्या याबाबत माहिती दिली आहे.

लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री आणि सोमवारी पहाटे राजौरी जिल्ह्यातील सीमेजवळील भागामध्ये एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यांच्याकडून दोन एके-47 रायफलसह हत्यारांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या भागामध्ये अद्यापही शोधमोहीम सुरू आहे. या संपूर्ण भागाला जवानांनी घेराव घातलेला आहे.

याआधी 3 सप्टेंबर रोजी याच भागामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता आणि फरार झाले होते. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र तेव्हापासून दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम हाती घेण्यात आली होती.

तत्पूर्वी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राजौरीमध्ये जवानांनी दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त केला होता. तर जुलैमध्ये गुंधा भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या चौकीवर हल्ला केला होता. यात एक जवान जखमी झाला होता.

जम्मू-कश्मीरमध्ये याच महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. तीन टप्प्यात ही निवडणूक पार पडणार असून 18 सप्टेंबक, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला मतदान पार पडेल. या निवडणुकीपूर्वी खोऱ्यात दहशतवादी मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत. त्यांना रोखण्यासाठी आणि यमसदनी धाडण्यासाठी लष्करानेही तयारी केली आहे.