वर्षावर राजकीय बैठक झाल्याचा मिंध्यांकडून इन्कार; निवडणूक आयोगाला दिला एक ओळीचा खुलासा

निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याच्या मुद्यावरून निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटीसला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन खासगी सचिवांनी उत्तर दिले आहे.  वर्षा निवासस्थानी कोणतीही राजकीय बैठक आयोजित केली नव्हती एवढाच मोघम खुलासा केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम पत्रिकेत नमूद केलेल्या राखीव वेळेत राजकीय ‘गुफ्तगु’ झाल्याचे दिसून येते.

वर्षा बंगल्यावर राजकीय बैठक झाल्याची तक्रार काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी एक्सच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पीएस अमोल शिंदे व उपसचिव नितीन दळवी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

या नोटीसला मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱयांनी उत्तर दिले आहे. ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी कोणत्याही राजकीय बैठकीचे आयोजन केले नव्हते असे स्पष्टीकरण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राखीव वेळेमुळे ‘वेळ’ मारून नेली   

वर्षा निवासस्थानी 6 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीच्या मुद्यावरून निवडणूक आयोगाने ही नोटीस बजावली होती.  पण त्या दिवशी मुख्यमंत्र्याच्या दैनंदिन कार्यक्रम पत्रिकेत ’वर्षा निवासस्थानी राखीव वेळ ’ असा उल्लेख होता. त्यामुळे अशा कोणत्याही बैठकीचे आयोजन केले नसल्याचा एक ओळीचा खुलासा संबंधित अधिकाऱयांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.