नको तिथे स्टंटबाजी जीवावर बेतली; रिल्सच्या नादात दोघांचा मृत्यू, तीन जखमी

हल्ली सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासाठी तरुणाई काय करेल याचा नेम नाही. मात्र तरुणांचं हेच नको ते धाडस जीव त्यांचा धोक्यात आणत आहे. अशीच एक घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. भरधाव कारमध्ये रिल्स बनवताना दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. अन्य तीन तरुण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एका तरुणाचा वाढदिवस होता. त्यामुळे पाच मित्रांनी वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्याचा प्लान केला. पाचही मित्र कारने एका ठिकाणी गेले. तेथे त्यांनी मद्य पार्टी केली. मग बिर्याणी खाण्याचा प्लान केला. पाचही जण मग मद्यधुंद अवस्थेत बिर्याणी खायला रेस्टॉरन्टकडे कारने निघाले.

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली होती. कार चालवणारा तरुण स्टंटबाजी करत गाडी चालवत होता. रस्त्यावर बेदरकारपणे कार चालवत तरुण चालले होते. अन्य मित्र मोबाईलमध्ये रिल्स बनवत होते. यावेळी कार अनियंत्रित झाली आणि बॅरिगेटला धडकली.

तरुणांचा ओरडण्याचा आवाज ऐकून आसपासचे नागरिक धावत आले. मात्र दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. अन्य तीन जखमींना नागरिकांनी रुग्णालयात नेले. नागपूर शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.