बनावट कागदपत्रांच्या आधारे व्हिसा काढून आखाती देशात नोकरीसाठी जाऊ पाहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना सहार पोलिसांनी अटक केली. मोहंमद आलम अस्कूर मंडल आणि मोहम्मद तोहिद अहमद अशी या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.
मूळचे बांगलादेशचे रहिवासी असलेले मोहंमद आलम आणि मोहंमद अहमद हे दोघे रविवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. विमानतळावर अधिकाऱ्याने त्या दोघांच्या पासपोर्ट, तिकीट आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली. ते दोघे बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय इमिग्रेशन अधिकाऱ्यांना आला. त्या दोघांची कसून चौकशी केल्यावर त्याने बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली.
मोहंमद आलम हा 15 वर्षांपूर्वी हिंदुस्थानात आला होता. त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे ओळखपत्र, कॅनकार्ड बनवले होते. दोन वर्षांपूर्वी त्याने पासपोर्टसाठी अर्ज केला होता. त्या पासपोर्टवर तो कामासाठी रियाधला जाणार होता. बनावट पासपोर्टसाठी त्याने एजंटला पैसे दिले होते. तर मोहंमद तोहीद हा 2015 मध्ये हिंदुस्थानात आला. त्याने देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवला होता. 2021 मध्ये त्याने पासपोर्ट हरवल्याचे सांगून नवीन पासपोर्ट मिळवला होता. तो देखील नोकरीसाठी दोहा येथे जाणार होता. त्या दोघांनी नेमक्या कोणत्या एजंटच्या मदतीने पासपोर्ट मिळवला होता याचा तपास सहार पोलीस करत आहेत.