भाजपची युती म्हणजे गद्दारांची युती! वंचितच्या भूमिकेवर तुषार गांधी यांची जळजळीत टीका 

देशात लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी विरोधी पक्ष आणि नेते एकत्र आले आहेत, तर दुसरीकडे भाजपही इतर पक्षांबरोबर युती करत आहे. मात्र भाजपच्या युतीला गद्दारांची युती म्हटले पाहिजे. या गद्दारांच्या युतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे. यासाठी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नका, असे आवाहन तुषार गांधी यांनी केले.

महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी हे वेळोवेळी सामाजिक, राजकीय घडामोडींवर आपल्या भावना व्यक्त करत असतात. भाजप आणि मोदींविरोधातली भूमिका असूनही वंचित आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आपापले उमेदवारही जाहीर केले आहेत. मात्र यामुळे मतांची विभागणी होऊन शेवटी त्याचा फायदा हा भाजपला होणार आहे, हे उघड सत्य आहे. महाराष्ट्रातील चालू घडामोडींवर बोलताना तुषार गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “आमची कितीही चांगली मैत्री असली तरी जे चूक आहे, त्याला चूकच म्हणायची आता स्पष्ट वेळ आली आहे. यापूर्वी जी चूक झाली तीच पुन्हा होऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान जपायचे असेल तर ही शेवटची संधी आहे.’’