ट्रकच्या पाठीमागील बाजूस रंगाचे डबे; आतमध्ये दारू, पुष्पा स्टाईल दारू वाहतूक उघड

नववर्षाच्या मध्यरात्री खेड शिवापूर टोलनाक्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून ट्रकसह तब्बल एक कोटी रुपयांचा दारूसाठा जप्त केला. या गोवानिर्मित दारूला राज्यात विक्रीसाठी परवानगी नाही. कुणाला संशय येवू नये, यासाठी आरोपींनी ट्रकच्या पाठीमागील बाजूस रंगाचे डबे ठेवले होते. मात्र, उत्पादन शुल्कच्या पथकाने आतमध्ये तपासणी केल्यानंतर विविध कंपन्यांचे जवळपास बाराशे बॉक्स आढळून आले. ट्रकचालकासह साथीदाराला अटक केली आहे.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर परिसरात अवैध मद्याची वाहतूक, विक्री होते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके रात्रभर गस्तीवर होते. यादरम्यान गोव्यातील मद्य मोठ्या प्रमाणावर पुणे शहर परिसरात विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे अधिक्षक चरणसिंह रजपूत यांना मिळाली. त्यानूसार सासवड पथकाला कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानूसार पथकाने संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर टोलनाक्याजवळ पथकाने संशयित ट्रकची तपासणी केली. तेव्हा ट्रकमध्ये मद्याच्या बाटल्या सापडल्या. आरोपींनी ट्रकच्या पाठीमागील बाजूस रंगाचे डबे भरून ठेवलेले होते. मात्र, पुढील बाजूस दारूचे बॉक्स होते.

पोलिसांना ट्रकमध्ये गोल्ड अ‍ॅण्ड ब्लॅक रमच्या 38 हजार 640 बाटल्या, बीरा राईज बीअरचे 5 हजार 160 कॅन, टुबर्ग बीअरचे 6 हजार 720 कॅन असा तब्बल बाराशेहून अधिक बॉक्स आढळून आले. पथकाने राजस्थान पासिंगचा ट्रक आणि दारूसाठा असा तब्बल 1 कोटी 1 लाख सत्तार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ट्रकचालकासह साथीदाराला अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुुणे अधीक्षक चरणसिंह रजपूत, उपअधीक्षक संजय पाटील, युवराज शिंदे, एस. बी. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणाचा पुढील तपास सासवड येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून करण्यात येत आहे.

नववर्षाच्या मध्यरात्री राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत असा दारूसाठा पकडण्यात आला आहे. हा साठा नेमका कुठे नेण्यात येत होता, याबाबतचा तपास करण्यात येत असून दोघांना अटक केली आहे.
– चरणसिंह रजूपत, अधिक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पुणे.