ट्रकचालकांच्या संपाला उत्तर प्रदेशात हिंसक वळण, चालकांच्या दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज

हिट अँड रनसंबंधातील नवीन कायद्याविरोधात ट्रक आणि बस चालकांच्या संपाला उत्तर प्रदेशात हिंसक वळण लागलं आहे. येथील मैनपुरी भागात संप सुरू असताना पोलीस आणि चालकांमध्ये वाद झाला. वादाची परिणती हिंसेत झाली आणि चालकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करायला सुरुवात केली. पोलिसांनी त्याला रोखण्यासाठी लाठीचार्ज केला. मात्र, तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नाही असं पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या आणि हवेत गोळीबार केला.

हिट अँड रनसंदर्भातील नवीन कायद्याविरोधात बस आणि ट्रक चालकांकडून देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. उत्तर प्रदेशमधील मैनपुरी येथे संप सुरू असताना ट्रक चालकांनी रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रस्ता मोकळा केल्यानंतर परिस्थिती चिघळली. ट्रकचालकांनी पोलीस पथकावर दगडफेक करायला सुरुवात केली. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी आधी लाठीचार्ज केला.

तरीही परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर हवेत गोळीबार केला. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी गोळीबार केल्याचं नाकारलं आहे. या घटनेत काही पोलीस कर्मचारी आणि काही चालक जखमी झाले आहेत.