नवी मुंबई, वसईत संपाला हिंसक वळण; ट्रकचालकांचा पोलिसांवर हल्ला! दगडफेक आणि काठ्यांनी मारहाण!!

केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात देशभरातील ट्रकचालकांनी पुकारलेल्या संप, आंदोलनाला आज नवी मुंबई आणि वसईत हिंसक वळण लागले. मोदी सरकार हाय हाय… जाचक कायदा मागे घ्या, अशा घोषणा देत ट्रकचालकांनी जे.एन.पी.ए. मार्गावरील नवी मुंबईतील कोंबडभुजे परिसरात पोलिसांवर लाठय़ाकाठय़ांनी हल्ला केला. तसेच दगडफेक करून अनेक वाहनांची तोडपह्डही केली. ट्रकचालकांनी पोलिसांच्या गाडीवरही तुफान दगडफेक केली. तर मुंबई-अहमदाबाद मार्गावर वसईतील चिंचोटी येथेही रास्ता रोको करत वाहतूक रोखून धरली. नवी मुंबईतील हल्ल्याप्रकरणी 40 आंदोलक ट्रकचालकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, नवा मोटार वाहन कायदा तातडीने रद्द न केल्यास आंदोलन आणखी व्यापक करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातील ट्रकचालक व मालकांनी तीन दिवसांचा संप आजपासून पुकारला आहे. महाराष्ट्रातदेखील या संपाला मोठा प्रतिसाद मिळत असून केंद्राच्या विरोधात नवी मुंबई, वसई, पनवेल यांसह विविध भागांत ट्रकचालक आक्रमक झाल्याचे दिसून आले. अपघात घडल्यानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱया वाहनचालकांना दहा लाख रुपये दंड आणि सात वर्षांची शिक्षा, अशी तरतूद या नवीन कायद्यात करण्यात आली आहे. या कायद्याला ट्रकचालक व मालकांनी ठाम विरोध केला असून तो त्वरित रद्द करावा, अशी मागणी केली आहे.

चिंचोटीमध्ये रास्ता रोको
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चिंचोटी येथे ट्रकचालकांनी आज अचानक रास्ता रोको केला. त्यामुळे या महामार्गावर दोन्ही बाजूला मोठी वाहतूककोंडी झाली. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस चिंचोटी येथे आल्यानंतर ट्रकचालकांनी पोलिसांच्या वाहनावर जोरदार दगडफेक केली. त्यात पोलिसांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांच्या वाहनावर झालेल्या दगडफेकीमुळे या भागात तणाव पसरला.

कळंबोली सर्कल ठप्प
कळंबोली सर्कल येथे वाहनचालक आणि मालकांनी आज सकाळी चक्का जाम केला. मुंबई-सायन मार्ग, पनवेलच्या दिशेने जाणारा मार्ग आणि जेएनपीएकडे जाणाऱया मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

जेएनपीएमध्ये शुकशुकाट
उरण येथील जेएनपीएच्या पाच बंदरांमध्ये दररोज हजारो जड आणि अवजड वाहनांची वर्दळ असते. मात्र आज देशभरातील ट्रकचालक आणि मालकांनी आंदोलन सुरू केल्यामुळे या सर्वच बंदरांत शुकशुकाट होता. जेएनपीएच्या परिसरात संतप्त ट्रकचालकांनी रास्ता रोको केला. त्यामुळे या भागात मोठी वाहतूककाsंडी झाली. जेएनपीएच्या बंदरात आज एकही वाहन न गेल्याने कामकाज पूर्णपणे ठप्प राहिले.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि गुजरात या आठ राज्यांत बस आणि ट्रकचालकांनी संप पुकारला.
महाराष्ट्रात नाशिक, नागपूर, गोंदियासह अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा जाणवला.
भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेरसह अन्य भागात बसेस धावल्याच नाहीत.
इंदौरमध्ये 900 बस बंद होत्या.

नवी मुंबईतील उरणफाटा ते जेएनपीए मार्गावर ट्रकचालकांनी आपली वाहने उभी करून केंद्र सरकारचा निषेध केला. सकाळी नऊच्या सुमारास काही ट्रकचालकांनी काsंबडभुजे परिसरात रास्ता रोको केल्याने या मार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली.

पोलिसांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला असता सुमारे 50 ट्रकचालकांनी लाठय़ाकाठय़ांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. मोठय़ा संख्येने चालक रस्त्यावर उतरल्यामुळे पोलिसांना घटनास्थळावरून मागे हटावे लागले.

ट्रकचालकांनी पोलिसांचा हातात लाठय़ाकाठय़ा घेऊन पाठलाग केला. त्यानंतर पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून 40 ट्रकचालकांना अटक केली. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी एनआरआय पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनाच्या ठिकाणी गेले. त्यावेळी ट्रकचालकांनी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून मार्गावरील अन्य वाहनांवर दगडफेक सुरू केली.

नव्या मोटार कायद्याविरोधात संप कशासाठी?
अपघात स्थळावरून ट्रक चालक पळाल्यास 10 वर्षे कारावास; 5 लाखांचा दंड
यापूर्वी आयपीसी कलम 304 अंतर्गत आरोपीला केवळ दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागत होता.
जखमींना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केल्यास तेथे जमलेल्या जमावाकडून चालकाला मारहाण होऊ शकते.
कुणीही वाहनचालक जाणूनबुजून अपघात घडवत नाही. अनेकदा धुके किंवा इतर कारणांमुळे अपघात घडतो.