INDIA आघाडी अधिक मजबूत, लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा के सुरेश यांना पाठिंबा

Trinamool Congress with India

देशाचं लक्षं आज होणाऱ्या लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागलं आहे. भाजपकडे यंदा बहूमत नाही, NDA च्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी काठावरचे यश मिळवले आहे. आता लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची ओढाताण सुरू आहे. अशातच तृणमूल काँग्रेसने आज लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे के सुरेश यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षानं काल सांगितलं होतं की के सुरेश यांना एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांच्या विरोधात उभे करण्यापूर्वी त्यांच्याशी सल्लामसलत केली गेली नव्हती आणि हा निर्णय ‘एकतर्फी’ असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली होती.

ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी काल सांगितलं, ‘याबाबत आमच्याशी संपर्क साधला गेला नाही, कोणतीही चर्चा झाली नाही. दुर्दैवाने, हा एकतर्फी निर्णय आहे’. त्यानंतर के सुरेश यांनी स्पष्ट केलं की तृणमूलचे डेरेक ओब्रायन आणि कल्याण बॅनर्जी यांनी काल संध्याकाळी INDIA ब्लॉकच्या बैठकीत भाग घेतला आणि ‘सर्व काही स्पष्ट झालं’.

तीन वेळा खासदार राहिलेले आणि गेल्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे या निवडणुकीत आघाडीवर आहेत. मात्र असे असले तरी निश्चित काही सांगता येत नाही. अशातच सात खासदारांनी अद्याप शपथ घेतली नाही आणि केरळमधील वायनाडची जागा रिक्त आहे. याचा अर्थ आज 535 खासदार मतदान करण्यास पात्र आहेत आणि 268 हा बहुमताचा आकडा ठरणार आहे. एनडीएच्या उमेदवाराला 293 खासदारांचा आणि वायएसआर काँग्रेस पक्षाच्या चार खासदारांचा पाठिंबा आहे. सूत्रांनी सांगितले की, भाजप 300 चा आकडा पार करण्यासाठी इतर खासदारांशी संपर्क साधत आहे.

दुसरीकडे, विरोधकांनी राजकीय मुद्दा मांडण्यासाठी स्पर्धा घेण्यास भाग पाडले आहे. आठ टर्म खासदार के सुरेश यांना 233 खासदारांचा (तृणमूल सदस्यांसह) पाठिंबा आहे, जे बहुमताच्या संख्येपेक्षा 35 कमी आहेत.

स्वातंत्र्यानंतर लोकसभा अध्यक्षपदाची ही तिसरी निवडणूक आहे. अध्यक्षांची निवड सर्वसाधारणपणे सर्वसहमतीने केली जाते. यावेळी सरकारने विरोधी पक्षांच्या पाठिंब्यासाठी संपर्क साधला होता. विरोधी बाकांवरून उपाध्यक्षांची नियुक्ती झाल्यास एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली होती.