म्हाडा ऍक्शन मोडवर, संक्रमण शिबिरांची होणार झाडाझडती

संक्रमण शिबिरातील घुसखोरी, विकासक आणि घुसखोरांकडून वर्षानुवर्षे थकवले जाणारे भाडे अशा गैरप्रकारांना लगाम घालण्यासाठी म्हाडा आता अॅक्शन मोडवर आली आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे संक्रमण शिबिरांची झाडाझडती घेतली जाणार असून त्याचा आढावा दर मंगळवारी म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी रेंट कलेक्टरकडून घेणार आहेत. त्यानुसार संबंधितांवर काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

मुंबई शहरात म्हाडाची 34 संक्रमण शिबिरे असून त्यामध्ये सुमारे 20 हजार घरे आहेत. संक्रमण शिबिरातील वाढती घुसखोरी ही म्हाडासाठी वर्षानुवर्षे डोकेदुखी ठरत असून घुसखोराला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान म्हाडापुढे आहे. अनेकदा कायदेशीर आणि सुरक्षेचा प्रश्नदेखील निर्माण होतो. इमारतीचा पुनर्विकास करताना रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून म्हाडातर्फे संक्रमण शिबिरात घरे उपलब्ध करून दिली जातात. पुनर्विकास होऊन घराचा ताबा मिळाला तरी काहीजण संक्रमण शिबिरातील घरे परत करत नाहीत. काहींनी तर संक्रमण शिबिरातील घरांची परस्पर विक्री केल्याचे प्रकारदेखील समोर आले आहेत. सद्यस्थितीत संक्रमण शिबिरातील मूळ रहिवाशांकडून दरमहा 500 रुपये तर घुसखोरांकडून 3 हजार रुपये भाडे आकारले जाते. काही विकासकांनी आणि घुसखोरांनी भाडे थकवल्यामुळे म्हाडाला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

संक्रमण शिबिराची झाडाझडती घेण्याच्या सूचना रेंट कलेक्टरला दिल्या आहेत. त्यामुळे येथील रिक्त गाळय़ांसह मूळ रहिवासी आणि घुसखोरांची संख्या, भाडेवसुलीची सद्यपरिस्थिती, निष्कासनाची नोटीस दिलेल्यांवरील कारवाई, इमारतीची दुरुस्ती होऊनही कितीजण शिबिरात राहतायत याचा आढावा आम्ही दर आठवडय़ाच्या बैठकीत त्यांच्याकडून घेणार आहोत. त्यानुसार संबंधितांवरील कारवाईची पुढील दिशा ठरवली जाईल, उमेश वाघ, सहमुख्य अधिकारी, मुंबई इमारत आणि दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ