12 जानेवारीला ट्रान्सहार्बर लिंकचे उद्घाटन, महिनाअखेरीस कोस्टल रोड खुला

महाविकास आघाडी सरकारच्या काळात काम सुरू झालेला मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू आणि मुंबईतील कोस्टल रोड चालू महिन्यात लोकांसाठी खुला केला जाणार आहे. एमटीएचएलचे 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे तर कोस्टल रोडचा पहिला टप्पा महिनाअखेरीस खुला होणार आहे. काम पूर्ण झालेले हे प्रकल्प नागरिकांच्या सेवेसाठी खुले केले पाहिजेत अशी शिवसेनेकडून सातत्याने मागणी होत आहे.

एमटीएचएल आणि कोस्टल रोडची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून आढावा घेतला. कोस्टल रोडच्या वरळी सी-फेस ते मरीन ड्राइव्हदरम्यानच्या जुळय़ा भूमिगत बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. नेपियन्सी रोडवरील प्रियदर्शनी पार्कजवळ हा बोगदा उघडतो. जानेवारी महिनाअखेरीस तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

कोस्टल रोडला टोल नाही

कोस्टल रोडला कोणताही टोल लावला जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. एमटीएचएल आणि कोस्टल रोड या प्रकल्पांसाठी चार हावडा ब्रीज होतील, सहा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी होतील एवढे स्टील वापरण्यात आले आहे. पृथ्वीला दोन वेळा प्रदक्षिणा होतील एवढय़ा वायर्स या प्रकल्पात वापरल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.