जिभेच्या कर्करोगावर मुंबईतल्या रुग्णालयात मिळाले उपचार, फिजीची महिला इम्युनोथेरपीनंतर पूर्णपणे बरी

जानेवारी २०२४ मध्ये भारतीय वंशाची व एका बेट राष्‍ट्राची रहिवासी सुसानचा एचसीजी आयसीएस खुबचंदानी कॅन्‍सर हॉस्पिटल, कुलाबामधील तज्ञ डॉक्‍टरांच्‍या टीमने स्‍क्‍वॅमास सेल कार्सिनोमा ऑफ टूग म्‍हणजेच जिभेच्‍या कर्करोगावर उपचार केला. मेडिकल ऑन्‍कोलॉजिस्‍ट सचिन त्रिवेदी यांनी टीमचे नेतृत्‍व केले, जेथे टीममध्‍ये रॅडिएशन ऑन्‍कोलॉजिस्‍ट डॉ. भाविन विसारिया आणि हेड अँड नेक सर्जन डॉ. आकाश तिवारी यांचा समावेश होता. सुसानचे न्‍यूझीलंडमध्‍ये या आजारासह निदान झाले आणि ती उपचारासाठी एचसीजी आयसीएस खुबचंदानी कॅन्‍सर हॉस्पिटल, कुलाबा येथे आली.

३१ वर्षीय सुसानला बोलताना व गिळताना त्रास होत होता, तसेच रक्‍ताच्‍या उलट्या देखील होत होत्‍या. एचसीजी आयसीएस खुबचंदानी कॅन्‍सर हॉस्पिटल, कुलाबा येथील डॉक्‍टरांनी तिचे मान व छातीचे सविस्‍तर स्‍कॅन केले, ज्‍यामधून निदर्शनास आले की तिच्‍या जिभेच्‍या उजव्या बाजूला गाठ होती आणि घशाच्‍या मध्‍यापासून मागील भागापर्यंत वाढली होती. ही गाठ वाढल्‍याने आसपासच्‍या स्‍नायूंवर परिणाम झाला होता आणि घशामधील श्‍वसननलिका दबली गेली होती.

इम्‍युनोथेरपी उपचारामध्‍ये कर्करोगाशी लढण्‍याकरिता व्‍यक्‍तीच्‍या स्‍वत:च्‍या रोगप्रतिकारशक्‍तीचा वापर केला जातो. ही उपचारपद्धत तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, मूत्रपिंडाचा कर्करोग, डोके व मानेचा कर्करोग इत्‍यादींच्‍या उपचारामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ही उपचारपद्धत कर्करोगाच्‍या पेशींना पसरण्‍यापासून प्रतिबंध करत दीर्घकाळापर्यंत जगण्‍याच्‍या शक्‍यतेमध्‍ये वाढ करते आणि उपचार थांबल्‍यानंतर देखील कर्करोगाशी सामना करण्‍यास मदत करण्‍यासाठी रोगप्रतिकारशक्‍ती वाढवते. इम्‍युनोथेरपीचा आणखी एक फायदा म्‍हणजे सरासरी रूग्‍णाला कर्करोगासाठी पारंपारिक उपचारांच्‍या तुलनेत कमी प्रतिकूल परिणामांचा सामना करावा लागतो.

डॉक्‍टरांचे कौशल्‍य, जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि इम्‍युनोथेरपीने उत्तम परिणाम दाखवले आहेत, जेथे कर्करोगाने पीडित रूग्‍णांनी उपचाराला उत्तम प्रतिसाद दिल्‍याचे निदर्शनास आले आहे. उपचारांना जवळपास एकूण रेडिओलाजिकल प्रतिसाद मिळाला, ज्‍यामध्‍ये उपचाराच्‍या एका चक्रानंतर १० टक्‍क्‍यांपेक्षा कमी कर्करोग दिसून आला होता.

एचसीजी आयसीएस खुबचंदानी कॅन्‍सर हॉस्पिटल, कुलाबा येथील मेडिकल ऑन्‍कोलॉजीचे संचालक डॉ. सचिन त्रिवेदी यांनी या केसमध्‍ये डॉक्‍टरांच्‍या टीमचे नेतृत्‍व केले. ते म्‍हणाले, ”रोगप्रतिकारशक्‍तीशी संबंधित टॉक्झिसिटीज, तसेच तिच्या आजाराचे स्वरूप व व्‍याप्‍ती आणि संबंधित वैद्यकीय समस्यांमुळे आम्ही आतापर्यंत हाताळलेली ही सर्वात गुंतागूंतीची केस होती. कर्करोग प्रगत अवस्थेत पोहोचला होता आणि त्‍वरित उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे होते. वेळीच दखल घेतली नाही तर ते जीवघेणे ठरले असते. आम्हाला रुग्णावर अत्यंत काळजी आणि अचूकतेने उपचार करावे लागले. इम्युनोथेरपीसारख्या उपचारांसह वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीने कर्करोगाचे वेळेवर निदान आणि उपचार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ही एक उल्लेखनीय केस आहे, ज्‍यामधून उपचाराच्या फक्‍त एका चक्रात त्वरित सकारात्मक परिणाम आणण्यासाठी औषधोपचार, तंत्रज्ञान आणि तज्ञांची क्षमता दिसून येते.”

जून २०२४ मध्‍ये हॉस्पिटलमधून डिस्‍चार्ज देण्‍यात आलेली सुसान म्‍हणाली, ”मला दुसरे जीवनदान देण्‍यात आले आहे आणि त्‍यासाठी मी सर्वांची कृतज्ञ आहे. कर्करोगामधून वाचण्‍याच्‍या प्रवासाने मला आशा व स्थिरतेची शिकवण दिली आहे आणि मी कायमस्‍वरूपी या शिकवणीचे पालन करेन. पुढे जात मी आनंदाने व उत्‍साहात माझे जीवन जगेन. मी एचसीजी आयसीएस खुबचंदानी कॅन्‍सर हॉस्पिटल, कुलाबा येथील वैद्यकीय टीमचे आभार मानते. त्‍यांनी संपूर्ण रिकव्‍हरीदरम्‍यान मला आधार दिला आणि सतत मला प्रेरणा व आरामदायीपणा दिला.”

सुसान पूर्णपणे बरी झाली आहे आणि तिच्‍या घरामध्‍ये रेडिओथेरपी पूर्ण करेल, ज्‍यानंतर ती तिचे सामान्‍य जीवन जगू शकेल.