जगभरातून बातम्यांचा आढावा

ज्युलियन असांजे यांची अखेर सुटका
विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांची पाच वर्षांनंतर कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. लंडनमधील कारागृहातून सुटका झाल्यानंतर ते आपला मूळ देश ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. अमेरिकेसोबत झालेल्या सामंजस्य करारानंतर सरकारी डेटा चोरीच्या गंभीर आरोपाखाली दोषी असल्याप्रकरणी असांजे यांनी सहमती दिली आहे. 1901 दिवस कारागृहात घालविल्यानंतर 24 जूनच्या सकाळी बेलमार्श मैक्सिमम सिक्योरिटी जेलमधून त्यांची सुटका झाली. असांजे यांच्यावर 2010 आणि 2011 मध्ये गोपनीय सैन्य रेकॉर्ड प्रकाशित करण्याचा आरोप आहे.

एचडीएफसी बँकेचा ग्राहकांना झटका
यूपीआय व्यवहारांसाठी जर तुम्ही बँक खात्याचा वापर करीत असाल तर तुमच्यासाठी बँकेंकडून एक महत्त्वाची अपडेट आली आहे. आजपासून बँकेने 100 रुपयांपेक्षा कमी व्यवहार आणि 500 रुपयांहून कमी डिपॉजिटसंबंधी एसएमएस पाठविणे बंद केले आहे. मात्र ग्राहकांना बँकेकडून ईमेल नोटिफिकेशन मिळणे सुरूच राहणार आहे. बँकेने सर्व ग्राहकांसाठी सूचना जारी केल्या असून त्यांना ईमेल आयडी अपडेट करण्यास सांगितले आहे.

केरळ राज्याचे नाव केरळम होणार
केरळ राज्याचे नाव केरळम करण्यात यावे, यासाठी केरळ विधानसभेत दुसऱयांदा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. केंद्रीय गृहखात्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर केरळचे अधिकृत नाव केरळम होईल. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी नाव बदलण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. मल्याळम भाषेत केरळला केरलम असे संबोधले जाते. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.

जुलैमध्ये 12 दिवस बँका बंद
जुलै महिन्यात देशभरात विविध कारणांमुळे 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. विविध ठिकाणी 6 दिवस बँका सुरू राहणार नाहीत. याशिवाय चार रविवार आणि दोन शनिवारी बँका बंद राहतील. मोहरमच्या निमित्ताने 17 जुलै रोजी देशातील बहुतांश भागात बँका बंद राहणार आहेत. बँकेला सुट्टी असूनही तुम्ही ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे पैशांचे व्यवहार करू शकता. बँकांच्या सुटय़ांचा या सुविधांवर कोणताही परिणाम होणार नाही.

जगभरात 11 कोटी नागरिक विस्थापित
संयुक्त राष्ट्रांचे निर्वासितांसाठी उच्चायुक्त (यूएनएचसीआर) या यूएनच्या विस्थापित लोकांसाठी काम करणाऱया संघटनेच्या माहितीनुसार 2023 च्या अखेरपर्यंत जगभरात 11 कोटी 73 लाख लोक जबरदस्तीने विस्थापित झाल्याचे म्हटले. एकूण विस्थापितांपैकी सुमारे तीन चतुर्थांश आणि आंतरराष्ट्रीय संरक्षणाची गरज असलेले अन्य लोक फक्त पाच देशांमधून विस्थापित झाले. अफगणिस्तान, सिरिया, व्हेनेझुएला, युक्रेन आणि दक्षिण सुदान या देशांमधून 73 टक्के लोक विस्थापित झाले आहे.

दिल्लीत हिटस्ट्रोक, 10 जण गंभीर
राजधानी दिल्लीत सध्या उन्हाचा कहर सुरू असून विविध रुग्णालयात हिटस्ट्रोकमुळे 72 जण दाखल झाले आहेत. यातील अनेकजण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. यात ज्येष्ठ आणि लहान बालकांचादेखील समावेश आहे. सफदरंगज रुग्णालयात एकूण 15 रुग्ण दाखल असून यातील 10 जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर राम मनोहर लोहिया रुग्णालयात 14 पैकी सात जण व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी अनेक जण रस्त्यावर मजुरीचे काम करतात.

हिंदुस्थानी तरुणाची हत्या; एकाला अटक
अमेरिकेतील टेक्सासमध्ये हिंदुस्थानी नागरिकाच्या हत्येप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या टेक्सास येथे एका दुकानात चोरी करण्याच्या दरम्यान आरोपीने 32 वर्षीय हिंदुस्थानी तरुण दसारी गोपीकृष्ण याच्यावर गोळीबार केला होता. उपचारादरम्यान दसारी याचा मृत्यू झाला होता. दसारी हा मूळचा आंध्र प्रदेशचे असून आठ महिन्यांपूर्वीच तो अमेरिकेत आला होता. या हत्येप्रकरणी पोलिसांनी 21 वर्षीय डेवोंटा मॅथिसला अटक केली आहे.

शीss व्हेज बिर्याणीत सापडले चिकनचे हाड
हैदराबादमध्ये स्विगीवरून मागवलेल्या व्हेज बिर्याणीमध्ये हाड सापडल्याची घटना घडली. अविनाश नावाच्या ग्राहकाने सोशल मीडियावर याचा फोटो शेअर करून हा वाईट अनुभव शेअर केला. अविनाशने ‘मेहफिल’ या लोकप्रिय रेस्टॉरंट फ्रेंचायझीमधून ऑर्डर केलेल्या पनीर बिर्याणीमध्ये हाड सापडल्याचे सांगितले. त्याआधी साई तेजा नावाच्या एका युजर्सने ‘मेहफिल’च्या अन्य एका आउटलेटमधून मागवलेल्या चिकन बिर्याणीमध्ये अळी सापडल्याचे सांगितले.

अमेरिकेला हवेत हिंदुस्थानी विद्यार्थी
अमेरिकेत विज्ञान विषय शिकण्यासाठी हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची गरज आहे, चीनी विद्यार्थ्यांची गरज नाही, असे अमेरिकेचे उपसचिव कर्ट कॅम्पबेल म्हणाले. कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स थिंक टँक येथील कार्यक्रमात कर्ट कॅम्पबेल बोलत होते. पुरेसे अमेरिकन विद्यार्थी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शिकत नाहीत. अशा परिस्थितीत अमेरिकेला या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची भरती करण्याची गरज असून त्यात हिंदुस्थानातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणाले.

चीनची तैवानच्या हद्दीत घुसखोरी
चिनी विमानानी पुन्हा एकदा तैवानच्या हद्दीत खुसखोरी केली आहे, असा आरोप तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. रविवार आणि सोमवार असे दोन दिवस 23 चिनी विमाने आणि 7 नौदल जहाजांनी त्यांची सीमारेषा ओलांडली आहे. 23 पैकी 19 विमाने त्यांच्या उत्तर, दक्षिण-पश्चिम आणि पूर्व क्षेत्रातील डिफेंस आयडेंटिफिकेशन झोन (एडीआयझेड) मध्ये पोहोचली आहेत, असे तैवानने म्हटले आहे. चिनी सैन्यावर लक्ष ठेवण्यासाठी तैवानने आपली विमाने आणि नौदलाची जहाजे तैनात केली आहेत. यामध्ये क्षेपणास्त्र यंत्रणाही सक्रिय ठेवण्यात आली आहे.

टॉम क्रूझच्या मुलीने वडिलांचे आडनाव हटवले
हॉलीवूड सुपरस्टार टॉम क्रूझ आणि केटी होम्स यांची मुलगी सुरी क्रूझ लहान वयातच लोकप्रिय आहे. सुरी आता तिच्या नावावरून चर्चेत आलेय. सुरीने तिचे जगप्रसिद्ध असे ‘क्रूझ’ आडनाव काढले आहे. ती आता ‘सुरी नोएल’ असे नाव लावते. त्यामुळे हॉलीवूडमध्ये उलटसुलट चर्चा होत आहेत. 18 वर्षांच्या सुरीने नुकतेच तिचे शिक्षण पूर्ण केले. केटी होम्स आणि टॉम क्रूझचा 2012 साली घटस्फोट झाला. तेव्हापासून टॉम क्रूझ आणि त्यांची लेक सुरी यांचे नाते गुंतागुंतीचे बनले आहे.