तासगावकर कॉलेजला मुंबई विद्यापीठाची नोटीस; वर्ष 2015-16 पासून अपूर्ण असलेली कागदपत्रे दोन दिवसांत जमा करण्याचे आदेश

कर्जतच्या तासगावकर कॉलेजला मुंबई विद्यापीठाने नोटीस बजावली असून विद्यार्थ्यांची अपूर्ण असलेली कागदपत्रे येत्या दोन दिवसांत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेने तासगावकर अभियांत्रिकी कॉलेजविरोधात मुंबई विद्यापीठाकडे तक्रार केली होती. उत्तीर्ण होऊन आठ महिने उलटले तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाच मिळालेली नसल्याचे युवासेनेने विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिले होते. याप्रकरणी काही विद्यार्थ्यांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांना निवेदन दिले. महाविद्यालयाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होऊन आठ महिने लोटले, परंतु अजूनही त्यांना गुणपत्रिका देण्यात आलेल्या नसल्याचे तक्रारीत म्हटले होते.

विद्यापीठाने या तक्रारीची दखल घेत तासगावकर कॉलेजच्या लॉगीनमध्ये जाऊन तपासणी केली असता कॉलेजच्या विविध अभ्यासक्रम नावनोंदणी व पात्रतेसंबंधित प्रकरणे प्रलंबित असल्याचे समोर आले. वर्ष 2015-16 पासून आतापर्यंत शैक्षणिक वर्षानुसार किती प्रकरणे प्रलंबित आहेत, याची आकडेवारीच विद्यापीठाने कॉलेजला एका नोटिसीद्वारे पाठविली आहेत. या प्रलंबित प्रकरणांचा वेळीच निपटारा करणे आवश्यक असताना कॉलेजने ती जमा केलेली नाहीत. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट करून निकाल प्रलंबित राहिल्यास किंवा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याला कॉलेजच जबाबदार असेल, असा इशारा उपकुलसचिव अशोक घुले यांनी दिला आहे. विद्यापीठाने या प्रकरणाची त्वरित दखल घेतल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे आणि युवासेनेचे आभार मानले आहेत.