पेपरफुटीची कीड घालविण्यासाठी आरोग्य विद्यापीठाने अखेर एमबीबीएसच्या प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारे परीक्षा पेंद्रांवर पाठवण्यास सुरुवात केली आहे.
राज्यातील पन्नास परीक्षा केंद्रांवर 2 ते 16 डिसेंबर 2024 या कालावधीत एमबीबीएसची परीक्षा सुरू आहे. एकूण 7 हजार 939 विद्यार्थी द्वितीय वर्षाची परीक्षा देत आहेत. 2 डिसेंबरची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्याच्या एक तास आधी फुटली होती, याबाबतचा ई-मेल आरोग्य विद्यापीठाच्या नाशिक मुख्यालयाला 3 डिसेंबरला प्राप्त झाला. यानंतर हा पेपर रद्द करून 19 डिसेंबरला ही फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय झाला. 9 डिसेंबरला पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास आधी दुसऱयांदा प्रश्नपत्रिका फुटली, हे निदर्शनास येताच विद्यापीठाने दुसरी प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारे पाठवून त्याच दिवशी तत्काळ तो पेपर घेतला. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली. विद्यापीठ स्तरावर चौकशी समिती नेमण्यात आली. पेपरफुटीची ही कीड कुठून, कोणामार्फत लागली याचे निदान विविध तपासण्यांअंती झालेले नाही. ही कीड थांबविण्यासाठी आता परीक्षा केंद्रांवर ई-मेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठविण्याचा जालीम उपचार करण्यात येत आहे.