‘टू किल अ टायगर’ या हिंदुस्थानातील माहितीपटाला ऑस्करचे नामांकन

बहुप्रतिष्ठित अशा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या कॅटेगरीत हिंदुस्थानी माहितीपट ‘टू किल अ टायगर’ ला नामांकन मिळाले आहे. हिंदुस्थानातील एका छोट्या खेड्यातील अल्पवयीन मुलीवर झालेला लैंगिक अत्याचार व एका तरुणाचे तिला न्याय मिळवून देण्याची धडपड यात दाखवण्यात आली आहे.

या माहितीपटाचे दिग्दर्शन दिल्लीच्या निशा पहुजा यांनी केले आहे. हा माहितीट सर्वप्रथम टोरँटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाला होता. एका तेरा वर्षाच्या मुलीचे अपहण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेला असतो. त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी रणजीत नावाच्या व्यक्तीने केलेल्या खडतर संघर्षाचे चित्रण या माहितीपटात दाखवण्यात आले आहे. या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट कॅनेडियन फिल्म श्रेणीत ‘एम्प्लिफाई व्हॉईसेस’ पुरस्कार मिळाला होता. या माहितीपटाची निर्मिती कॉर्नेलिया प्रिन्सिप आणि डेव्हिड ओपेनहाइम यांनी केली आहे. या माहितीपटाबरोबरच ‘बॉबी वाइन : द पीपल्स प्रेसिडेंट’, ‘द इटर्नल मेमरी’, ‘फोर डॉटर्स’ आणि ‘२० डेज इन मारियुपोल’ यांचा नामांकनात समावेश आहे.

ऑस्कर पुरस्कार सोहळा हा लॉस एंजेलिसमधील ओव्हेशन हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये 10 मार्च रोजी होणार आहे.