कल्याण स्थानकाजवळ लोकल घसरली; मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, प्रवाशांमध्ये घबराट

टिटवाळय़ाहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल आज रात्री साडेआठच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकाजवळ घसरली. गार्डचा डबा रुळावरून खाली येताच अन्य डब्यांना हिसका बसला व प्रवाशांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक प्रवाशांनी खाली उतरून पायपीट करीत रेल्वे स्थानक गाठले. या प्रकारानंतर ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोसळले असून कल्याणसह डोंबिवली, ठाणे व अन्य स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली होती.

ही घटना कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 जवळ घडली. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबईकडे जाणारी टिटवाळा-सीएसएमटी लोकल ट्रेन कल्याण स्थानकावर पोहोचली असताना गार्डचा डबा अचानक रुळावरून घसरला. प्रवाशांची संख्या फारशी नव्हती. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. डबा  घसरल्यानंतर रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी आणि पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि डब्बा पुन्हा रुळावर आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.

रात्री वर्दळीच्या वेळी हा अपघात घडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले असून, रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली आहे. या घटनेमुळे अनेक प्रवासी गाडय़ा उशिराने धावत होत्या.  प्रवाशांमध्ये घबराट पसरली. रेल्वे प्रशासनाने डबा रुळावर आणल्यानंतर रात्री उशिरा वाहतूक पूर्ववत झाली.