‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितिक्षा तावडे म्हणाली, नव्या वर्षात मी चित्रकला, नवीन अनोळखी आणि वेगळी ठिकाणे शोधून त्या जागा फिरणे अशा छोटय़ा-छोटय़ा गोष्टी, ज्या मला आनंद देतात, त्यांना वेळ देणार आहे. माझ्या यू टय़ूब चॅनलवर लक्ष देईन. कारण मला या चॅनेलसाठी व्हिडीओ बनवायला खूप मजा येते. सातत्यपूर्ण व्यायाम करून, योग्य आहार घेऊन तंदुरुस्त राहण्यावर लक्ष केंद्रित करणार.
‘अप्पी आमची कलेक्टर’चा अर्जुन म्हणजे रोहित परशुराम सांगतो, 2024 मध्ये आपले काम प्रामाणिकपणे करत राहायचं हे तर आहेच, पण एक गुप्त संकल्प आहे, जो सध्या फक्त मलाच माहीत आहे. काही महिन्यांतच ते गुपित प्रेक्षकांच्या समोर येईल. नव्या वर्षात उत्तम काम आणि आरोग्याची काळजी घेईन.
संकल्पांबद्दल अभिनेत्री शिवानी रांगोळे म्हणाली, नव्या वर्षाच्या दिनचर्येत ध्यानधारणा नक्की असेल. दुसरे म्हणजे कुटुंबासोबत अधिक वेळ घालवेन. या दोन गोष्टींवर सरत्या वर्षात दुर्लक्ष झाले. पण नव्या वर्षात तसं होणार नाही.