तिरुपती लाडू वाद – आता लाडूत सापडले गुटख्याचे पाकिट, मंदिरात गेलेल्या भक्ताचा दावा

तिरुपती मंदिरातील लाडूच्या प्रसादात प्राण्यांची चरबी असल्याचा वाद पेटला असताना आता आणखी एक घटना समोर आली आहे. एका भक्ताने तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या डब्ब्यात गुटख्याचे पाकिट सापडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली असून हा वाद आणखी वाढणार आहे.

तेलुगु वेबसाईट, ‘समायम’, इंडिया टुडे आणि डेक्कन क्रॉनिकलने या संदर्भात वृत्त दिले आहे. त्याच्यानुसार 19 सप्टेंबर रोजी तेलंगणच्या खम्मम जिल्ह्यातून दोन्टू पद्मावती नावाची महिला तिरुपतीच्या मंदिरात गेली होती. तिथे त्यांनी दर्शन घेतेले आणि त्यानंतर प्रसाद घेतला. आता त्या प्रसादाबाबत दावा करण्यात आला आहे. महिलेने घेतलेला प्रसादाचा डबा घरी येऊन उघला असता त्यात गुटख्याचे पाकिट सापडले आहे. शिवाय त्या प्रसादातही गटख्याचे काही अंश मिळाले आहेत. आता सोशल मीडियावर त्या प्रसादाचे फोटो व्हायरल होत असून त्यावर वेगवेगळ्या कॉमेंट येत आहेत.

तिरुपती मंदिरात मिळणाऱ्या लाडूच्या प्रसादावरून वाद पेटलेला आहे. या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आणि एकच खळबळ उडाली.

वास्तविक, तिरुमला तिरुपती देवस्थानाने लाडूंमध्ये वापरण्यात येणाऱ्या तुपाची चाचणी करून घेतली होती. त्यांच्या वतीने हे तूप गुजरातस्थित पशुधन प्रयोगशाळेत (NDDB CALF Ltd.) पाठवण्यात आले. तुपाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले तेव्हा 9 जुलै ही तारीख होती. त्या तपासणीचा अहवाल 16 जुलै रोजी आला. त्यात तूप योग्य नसल्याचे सांगण्यात आले.