नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे थकीत कर्जाच्या वसुलीसाठी डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना चालविण्यास देण्यासाठी तिसऱयांदा निविदा प्रक्रिया करण्याची वेळ बँकेवर आली आहे. बँकेने केलेला दुसरा प्रयत्न असफल ठरला आहे.
नगर जिल्हा बँकेतर्फे सरफेसी ऍक्टनुसार थकीत कर्जापोटी तनपुरे साखर कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेण्यात आला. बँकेतर्फे तनपुरे कारखाना चालविण्यास देण्यासाठी पहिल्या निविदा प्रक्रियेत केवळ एकाच फॉर्मची निविदा आली. नंतर त्यांनीही पाठ फिरविल्याने बँकेला दुसऱयांदा निविदा प्रक्रिया करण्याची वेळ आली.
दुसऱया निविदा प्रक्रियेत नगर जिल्हा बँकेतर्फे काही अटी व शर्ती शिथिल करण्यात आल्या; परंतु त्यालाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला. अतुल दुगड (पुणे) या खासगी फर्मतर्फे निविदा भरण्यात आली. त्यांनी जिल्हा बँकेच्या थकीत कर्जाच्या व्यतिरिक्त तनपुरे कारखान्याची इतर देणी देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे आता तिसऱयांदा निविदा प्रक्रिया राबविण्याची वेळ जिल्हा बँकेवर आली आहे.
यंदाच्या वर्षी जिल्हाभरात पाऊस अत्यल्प झाला आहे. राहुरी तालुक्यात सरासरीच्या 60 टक्के पाऊस झाला आहे. मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यात मराठवाडय़ासाठी जायकवाडी धरणात दोन टीएमसी पाणी सोडावे लागले. त्यामुळे यंदा धरणातून एका आवर्तनाला फटका बसला आहे. सिंचनाची परिस्थिती बिकट असल्याने उसाच्या लागवडी घटल्या आहेत. पुढील वर्षी हंगामासाठी उसाचा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे, साखर कारखाना चालविणे कठीण आहे. सलग दोन वर्षे तनपुरे साखर कारखान्याचा गळीत हंगाम बंद आहे. तिसऱया वर्षीही उसाच्या टंचाईमुळे कारखाना सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे निविदांना प्रतिसाद नाही.
एडीसीसी बँकेतर्फे तनपुरे कारखाना चालविण्यास देण्याच्या दुसऱया निविदा प्रक्रियेत एकमेव निविदा आली. परंतु त्यांनी बँकेच्या थकीत देणीव्यतिरिक्त तनपुरे कारखान्याची इतर देणी देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे आलेली एकमेव निविदा संचालक मंडळाच्या बैठकीत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे तिसऱयांदा निविदा प्रक्रिया होणार आहे.
– नंदकिशोर पाटील, प्राधिकृत अधिकारी, एडीसीसी बँक