पुण्यात रंगणार दुरंगी, तिरंगी लढती; चुरस वाढणार

खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सचिन दोडके आणि भाजपतर्फे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना उमेदवारी जाहीर झाली. आमदार तापकीर यांना भाजपाने पहिल्या यादीत स्थान दिले नव्हते. त्यामुळे ते वेटिंगवर होते. उमेदवारीसाठी त्यांना झुंजावे लागले. भाजपाच्या स्थानिक, माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा विरोध. त्यानंतर आयात उमेदवार घेण्याची भाजपाची भूमिका. यामुळे तापकीर यांच्या निर्णयास भाजपा नेत्यांना उशीर झाला, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सचिन दोडके यांच्यासह काका चव्हाण, नवनाथ पारगे आणि बाळा धनकवडे हे चार जण इच्छुक होते. उमेदवार ठरवण्यासाठी त्यांना वेळ लागला. महाविकास आघाडीमध्ये ही जागा पवार यांच्या पक्षाला सुटल्यामुळे त्यांच्याकडून दोडके यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. गेल्या निवडणुकीमध्ये दोडके हे थोड्या मतांनी पराभूत झाले होते.

पर्वतीमध्ये कदम-मिसाळ लक्षवेधी लढत
पर्वती विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी अश्विनी कदम यांना जाहीर झाली. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणेच यावेळीदेखील पर्वतीमध्ये कदम विरुद्ध भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्यामध्ये लढत होणार आहे. याशिवाय काँग्रेसचे स्थानिक नेते आबा बागुल यांनीदेखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.गेल्या निवडणुकीत कदम-मिसाळ अशी रंगतदार लढत झाली होती. यावेळी मात्र महाविकास आघाडीतर्फे अश्विनी कदम निवडणूक लढवणार असल्याने पर्वती मतदारसंघातील लढत लक्षवेधी होणार आहे. याशिवाय भाजपामधील नाराज श्रीनाथ भिमाले कोणती भूमिका घेणार हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कॅन्टोन्मेंटमध्ये पुन्हा सुनील कांबळे
पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये भाजपाकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार सुनील कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली.

कसब्यात धंगेकर रासने रंगतदार लढत
कसबा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा पोटनिवडणुकीप्रमाणे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपातर्फे हेमंत रासने यांच्यामध्ये लढत होणार आहे. भाजपाने आज रासने यांना उमेदवारी जाहीर केली. भाजपाकडून कसबा मतदारसंघ स्वरदा बापट, कुणाल टिळक यांचीही नावे चर्चेत होती. त्यामुळे यावेळी भाजप रासने यांच्याऐवजी नवा उमेदवार देणार किंवा कसे याची उत्सुकता होती. परंतु रासने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे धंगेकर-रासने अशी रंगतदार लढत पुन्हा एकदा बघण्यास मिळणार आहे.