Nepal Plane Crashed : एका क्षणात कुटुंब संपलं; क्रू मेंबरसह पत्नी आणि मुलाचा होरपळून मृत्यू

धावपट्टीवरुन उड्डान घेत असतानाच विमान कोसळून 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नेपाळच्या विमानतळावर आज सकाळी घडली. या दुर्घटनेत पायलट बचावला असून तो जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सूर्या एअरलाईन्सचे हे विमान क्रू मेंबर्सना घेऊन काठमांडूहून पोखरा येथे चालले होते. या दुर्घटनेत एका क्रू मेंबरचे अख्खे कुटुंबच संपले आहे. क्रू मेंबर मनुराज शर्मा आपल्या पत्नी आणि मुलासह या विमानातून प्रवास करत होते.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त विमानात फ्लाइट मेंटेनन्स कर्मचारी मनुराज शर्मा पत्नी प्रिजा खतिवडा आणि चार वर्षांचा मुलगा अधिराज शर्मा यांच्यासह प्रवास करत होते. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला आहे. प्रिजा ही देखील सरकारी कर्मचारी होती आणि ऊर्जा मंत्रालयात असिस्टंट कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होती. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 17 जण सूर्या एअरलाइन्सचे कर्मचारी होते.

या दुर्घटनेत 37 वर्षीय पायलट एम आर शाक्य याचा जीव बचावला असून क्रॅश साईटवरुन त्याला रेस्क्यू करण्यात आले आहे. अपघातग्रस्त विमान 2003 मध्ये बनवण्यात आले होते. 21 वर्ष जुने विमान दुरुस्तीकरीता काठमांडू येथून पोखरा येथे चालले होते. मात्र उड्डान घेताच विमान विमानतळावरच कोसळले आणि आगीच्या भक्षस्थानी गेले.