रेल्वेच्या तिकिटावर तीन लाख पर्यटकांची सैर

देशविदेशातून मुंबईसह महाराष्ट्रात पर्यटनाला येणाऱया तब्बल 2 लाख 94 हजार पर्यटकांनी मध्य रेल्वेच्या पर्यटन पासवर सैर केली आहे. त्या माध्यमातून गेल्या आठ महिन्यांत रेल्वेला 1 कोटी 10 लाख रुपयांची कमाई झाली आहे.

पर्यटकांना एका तिकिटावर रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर फिरता यावे म्हणून मध्य रेल्वेने 2016 पासून पर्यटन तिकीट संकल्पना सुरू केली आहे. त्यानुसार एक दिवस, तीन दिवस आणि पाच दिवसांसाठीचे पर्यटक तिकीट काढता येते. या तिकिटावरून त्या दिवशी पूर्ण कालावधीत पर्यटकांना मुंबई उपनगरीय क्षेत्रात कुठेही आणि कितीही प्रवास करण्याची मुभा आहे. मध्य रेल्वेच्या पर्यटन तिकिटांना प्रवाशांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत 2 लाख 94 लाख प्रवाशांनी पर्यटन तिकिटांच्या सुविधेचा लाभ घेतला आहे. द्वितीय श्रेणीने 2 लाख 14 हजार पर्यटकांनी प्रवास केला आहे, तर एसी लोकलने 80 हजार पर्यटकांनी प्रवास केला आहे.