लाच घेताना सीजीएसटी अधीक्षकासह तिघांना अटक

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) अधीक्षकासह तिघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. 60 लाखांच्या लाचेपैकी 20 लाखांची लाच स्वीकारताना ते पकडले. तसेच त्याने हवालाच्या माध्यमातून अतिरिक्त 30 लाख रुपये स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयाचे सहा अधिकारी, एक सनदी लेखापाल आणि इतर खासगी व्यक्ती हे लाचेची मागणी करत होते. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्याने सीबीआयकडे धाव घेतली. त्या तक्रारीची सीबीआयने दखल घेतली. सांताक्रुझ येथील सीजीएसटी कार्यालयातील अधिकाऱयांनी तक्रारदार यांना बुधवारी बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळपर्यंत थांबवून ठेवले. अधीक्षकाने तक्रारदार यांना अटकेची भीती घालून सुरुवातीला 80 लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर ती 60 लाख रुपये लाचेच्या स्वरूपात देण्यास सांगितले. तसेच सीजीएसटी कार्यालयातील अधीक्षक आणि तिघांनी तक्रारदार यांच्यावर दबाव आणला. तक्रारदारांच्या विरोधात बळाचा वापर करून त्यांना लाच देण्यास भाग पडले. अधिकाऱयाच्या ताब्यात असतानाच तक्रारदाराच्या चुलत भावाशी संपर्क करून लाचेची मागणी पूर्ण करण्यास सांगितले.

तक्रारदार यांच्या चुलत भावाने सनदी लेखापाल यांच्याशी चर्चा करून 60 लाखापैकी 30 लाख रुपये देऊन सुटका करण्याआधी हवालाच्या माध्यमातून दिल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रार प्राप्त होताच सीबीआयने सापळा रचला. सीजीएसटी कार्यालयात 20 लाख रुपये स्वीकारताना सनदी लेखापालला पकडले. कारवाई अंतर्गत एका खासगी व्यक्तीला ताब्यात घेतले.