गुंडगिरी करून जागा बळकावली, सोलापुरात मिंधे गटाच्या पदाधिकार्‍यासह तिघांना अटक

गुंडगिरी करून जागा बळकावणार्‍या मिंधे गटाचा पदाधिकारी व त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. सुजित दत्तात्रय खुर्द, अर्जुन सिद्राम सलगर, सुजित लक्ष्मण कोकरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने तीनही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुजित खुर्द हा मिंधे गटातील युवासेनेचा प्रदेश पदाधिकारी आहे, तर अर्जुन सलगर हा वंचित बहुजन आघाडीचा बडा कार्यकर्ता आहे. या कारवाईने खळबळ उडाली असून, हे तिघे गेल्या काही दिवसांपासून फरार होते.

नवी वेस पोलीस चौकी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान असलेल्या जागेत पूजा हॉटेल आहे. सदर हॉटेलची जागा बळकावण्यासाठी मिंधे गटाचा पदाधिकारी सुजित खुर्द (रा. उमानगरी, मुरारजी पेठ, सोलापूर), अर्जुन सलगर (प्रेरणा सोसायटी, शिवाजीनगर बाळे), सुजित कोकरे (रा. बाळे), डॉ. विजयकुमार आराध्ये, केदार आराध्ये व त्यांच्या तीन साथीदारांनी पूजा हॉटेल जेसीबीच्या साहाय्याने पाडून जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान केले व जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून सुजित खुर्द, अर्जुन सलगर, सुजित कोकरे हे तिघे फरार होते. पोलिसांनी या तिघांना अटक केली असून, न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. खुर्द व सलगर या दोघांनी राजकीय वलयाचा उपयोग करून जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता.