माळकरी म्हणून मला हिणवणाऱ्यांना माझ्यामागे भजन म्हणून दाखवावे, असा टोला खेड-आळंदी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी आमदार दिलीप मोहिते यांना लगावला.
वारकरी आणि माळकरी आहे; परंतु भजन, हरिपाठ म्हणता येत नाही, अशी टीका महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते यांनी बाबाजी काळे यांच्यावर केली होती. त्यावर प्रतिउत्तर देताना काळे यांनी मोहितेंचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.
‘माझ्या गळ्यात माळ आहे, तुमच्या गळ्यात आहे का हे अगोदर स्पष्ट करा. माळकऱ्याला अभंग, हरिपाठ यावा लागतो, भजन यावे लागते’, अशी टीका आमदार मोहिते यांनी केली होती. माझ्यासोबत बसा मंदिरात मी पुढे हरिपाठ, अभंग म्हणतो तुम्ही माझ्या मागे फक्त हरिपाठ म्हणून दाखवा’, असे आव्हान काळे यांनी दिले.
माझ्या आर्थिक परिस्थितीवर टीका केली जाते, मान्य आहे मला की कोणत्याही प्रकारे अवैधरीत्या पैसे कमवले नसतील, मान्य आहे मला मी कोणाच्या जमिनी घेऊन अधिक पटीने विकल्या नाही, एमआयडीसीतून मी मलिदा कमवला नाही, मोठ्या मोठ्या विकासकामात मी टक्केवारी मिळवली नसेल; परंतु सर्वसामान्य जनता हीच माझी ताकद आहे. त्यामुळे येत्या २० तारखेला विद्यमान आमदारांना घरी पाठवणार आहे.