हा निकाल देशात परिवर्तनासाठी पोषक

लोकसभा निवडणुकीचा निकाल हा परिवर्तनासाठी पोषक असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशात नव्या राजकीय समीकरणाचे संकेत दिले. या निवडणूक निकालाने देशातील चित्रदेखील बदलले आहे. यात महाराष्ट्राची प्रमुख भूमिका आहे. याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचा मला अभिमान आहे, असे ते म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या सहकार्यामुळे हा विजय मिळवता आला अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.

सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सुरुवातीलाच त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी विचार पुढे नेणे, लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे अशी भूमिका महाविकास आघाडीतील पक्षांनी जनतेसमोर मांडली. जाती-धर्माच्या वादापलीकडे जाऊन रोजगार, महागाई यांसारख्या दैनंदिन भेडसावणाऱया समस्या सोडवण्यासाठी आघाडी कटिबद्ध होती. या भूमिकेचे जनतेने स्वागत केले, सन्मान राखला आणि महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला याबद्दल महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आपण आभारी आहोत, असे शरद पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि आम्ही जिवाभावाप्रमाणे लढलो
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना मिळालेल्या विजयाबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, बारामतीमधून आपल्या राजकारणाची सुरुवात झाली, त्यामुळे बारामती मतदारसंघामध्ये आम्हाला चांगले लीड मिळाले. राज्यातही उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिवाभावाप्रमाणे लढली, असे ते म्हणाले.

इंडिया आघाडीच्या बैठकीत पुढील दिशा ठरणार
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अन्य प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. उद्या सायंकाळी नवी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होईल. त्या बैठकीत सामंजस्याने निर्णय घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येईल, असे शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रात स्ट्राईक रेट जास्त
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेल्या कामगिरीचेही काwतुक यावेळी शरद पवार यांनी केले. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट जास्त होता असे ते म्हणाले. हे यश फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नसून महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आणि घटक पक्षांच्या मेहनतीमुळे मिळाले आहे असे सांगतानाच, यापुढेही महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेची खबरदारी घेऊ, असा शब्दही शरद पवार यांनी दिला.