ज्यांना तुरुंगात टाकायचं होतं, त्यांनाच उमेदवारी, हीच मोदी गॅरंटी

ज्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, त्या कृपाशंकर सिंग यांना नंतर त्यांनीच क्लीन चीट दिली. आता भाजपाची उमेदवारीही मिळाली, हीच मोदी गॅरंटी आहे. 195च्या यादीत सत्तरच्या आसपास असेच उमेदवार आहेत, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. पंतप्रधान मोदी एवढे मोठे नेते आहेत, मग तुमच्याकडे स्वतःचे काय आहे, असा सवालही फडणवीस यांना केला.

संजय राऊत यांनी रविवारी नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपाचा समाचार घेतला. कृपाशंकर सिंग, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्याबाबतीत भाजपाचे एकच सूत्र आहे. सिंग यांच्यावर आर्थिक गुह्यासंदर्भात खटले दाखल झाले. फडणवीस यांनी आधी गृहमंत्री असताना विधानसभेत विषय मांडून सिंग यांना तुरुंगात पाठवण्याची भाषा केली. नंतर क्लीन चीट दिली आणि आता वाराणसीच्या बाजूच्या जौनपूरची उमेदवारी बहाल केली. अशोक चव्हाण यांना तुरुंगात टाकायचं होतं, त्यांना राज्यसभेवर घेतले. अजित पवारांना शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चीट दिली, हीच मोदी गॅरंटी. त्यांच्या 195च्या यादीत सत्तरच्या आसपास असेच उमेदवार आहेत. उरलेल्या यादीबाबतही हेच घडणार आहे, असा हल्ला केला.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका. प्रत्येक पक्षाची एक शिस्त असते. प्रकाश आंबेडकर हे संविधान रक्षणाची भूमिका राज्यभर मांडत आहेत. देशात 2024 ला परिवर्तन झाले नाही, तर हुकूमशाहीला खऱया अर्थाने सुरुवात होईल आणि ही देशातील शेवटची निवडणूक राहील. हीच भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि प्रकाश आंबेडकर हे सुद्धा मांडत आहेत, असे संजय राऊत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा
देवेंद्र फडणवीस हे चाळीस हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना तुरुंगात पाठवणार होते. कोणत्या कोठडीत ठेवायचे तेही ठरलं होतं. आता मात्र क्लीन चीट दिली. मग, ते पुरावे फडणवीसांनी गिळले का, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला. पुरावे नष्ट करणं हासुद्धा अपराध आहे, त्याबद्दल फडणवीसांवर गुन्हा दाखल व्हायला हवा. इतकी वर्ष अजित पवार यांची बदनामी झाली, त्यांना बचावासाठी काकांच्या पाठीत खंजीर खुपसावा लागला, पक्षच काय कुटुंब सोडावं लागलं, हे पाहता सुनेत्रा अजित पवार, पार्थ पवार यांनी फडणवीस व भाजपावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करावा. त्यानंतरच बारामतीत जावून मतं मागावीत, असे खासदार संजय राऊत म्हणाले.