परतीच्या पावसाने नगर जिल्हय़ाला झोडपले! नगर, पारनेर, राहुरी तालुक्यांत पाऊस; सरासरी 129 मि.मी. पावसाची नोंद

नगर शहरासह जिह्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. हवामान खात्याने चार दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी नगर शहरासह जिह्यात दमदार पाऊस झाला. एकाच दिवशी 23.8 मिलिमीटर पाऊस झाला. यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते.

गणेशोत्सवात अकरा दिवस विश्रांती दिल्यानंतर मागील दोन-तीन दिवसांपासून जिह्यात पाऊस सुरू आहे. शनिवार, रविवारी दोन दिवस जिह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. सोमवारी परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने सोयाबीन, मूग, बाजरी, उडीदसह खरीप पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून जिह्याच्या उत्तर भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, दक्षिण भागाला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षाच होती.

जूनपासून जिह्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर वाढला. कर्जत, जामखेड, पाथर्डी, नगर, पारनेर तालुक्यांत कमी पर्जन्यमान असणाऱया ठिकाणीही दमदार पाऊस झाला. त्यामुळे बंधारे, पाझर तलाव, नदी नाले, ओढे वाहते झाले आहेत. परतीच्या पावसाने रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

खरीप पिकांचे मोठे नुकसान

n यंदा सुरुवातीला जिह्याच्या उत्तर भागात दमदार पाऊस झाला. ऑगस्ट अखेरपर्यंत दक्षिण भागाला दमदार पावसाची प्रतीक्षाच होती. खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, बाजरी, उडीद पिके यंदा चांगली आली. सध्या होत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱयांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने पुन्हा हिरावला जाण्याची शक्यता आहे. नगर, पारनेर, राहुरी तालुक्यांत झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

नगर, पारनेला अतिवृष्टी

n परतीच्या पावसाने नगर जिह्याला चांगलेच झोडपून काढले. सोमवारी नगर तालुक्यात 40.5, पारनेर 61.3, श्रीगोंदा 27.1, राहुरी 48.6, श्रीरामपूर 22.6 मि.मी. पाऊस झाला. तर इतर तालुक्यातही कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. जिह्यात आत्तापर्यंत सरासरी 129.3 मि.मी. पाऊस झाला आहे. नागापूर 73.5, रुईछत्तीशी 102, पारनेर 98, टाकळी 84.8 मि.मी. या महसूल मंडलात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली.

सीना नदीला पूर

n नगर तालुक्यातील जेऊर परिसर आणि नगर शहरात सोमवारी रात्री परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे नगर शहरातून वाहणाऱया सीना नदीला पूर आला होता. रात्री झालेल्या पावसामुळे मंगळवारी दुपारपर्यंत नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना केडगावमार्गे नगरला यावे लागत आहे.