किरण सामंतांच्या स्टेटसमुळे महायुतीत मिठाचा खडा; कुणाच्या बापाचे ऐकायचो नाही, नारायण राणेंना थेट इशारा

लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून निर्माण झालेला महायुतीमधील तिढा अजूनही सुटलेला नाही दुसरीकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिह्यातील महायुतीतील इच्छुक उमेदवार किरण सांमत यांनी ‘मिठाचा खडा.. कुणाच्या बापाचे ऐकायचो नाही..’ असे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले आहे. या स्टेटसच्या माध्यमातून किरण सामंत यांनी थेट नारायण राणे यांना इशारा दिल्याची चर्चा आहे.

महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जागा वाटप अजून होऊ शकलेले नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांच्या उमेदवारीसाठी भाजप आग्रही आहे. तर या मतदारसंघातच मंत्री उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. या दोघांमधील वादामुळे या मतदारसंघात उमेदवारी जाहीर होऊ शकलेली नाही.

पण या मतदारसंघात आपला दावा कायम ठेवण्यासाठी किरण सामंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धमकीवजा वक्तव्याचा उपयोग केला आहे. बारामती व्यापारी महासंघातर्फे आयोजित एका मेळाव्यात भाषण करताना माझ्या मताचाच खासदार हवा अशी धमकी अजित पवार यांनी आपल्या भाषणात बारामतीकरांना दिली होती. लोकसभा विधानसभा या दोन्ही वेळेला मला तुमची साथ लागेल. आपल्या विचारांचा खासदार झाला तर मोदी व अमित शहांकडून मी हवी तेवढी विकासाची कामे मंजूर करून आणू शकतो. त्यासाठी माझ्याच विचारांचा खासदार असणे आवश्यक आहे. मला खासदारकीला मिठाचा खडा लागला तर आमदारकीला मी वेगळा विचार करेन. त्यावेळी  कुणाच्या बापाचे ऐकणार नाही अशी धमकी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनी व्हॉट्सअॅपवर  अजित पवार यांच्या भाषणाचीच व्हिडीओ क्लीप शेअर केली आहे.  जर मिठाचा खडा पडला तर आमदारकीसाठी कोणाच्या बापाला ऐकणार नाही हा अजित पवारांच्या भाषणाचा स्टेटस व्हॉट्सअॅपवर ठेवला आहे. या स्टेटसद्वारे त्यांनी थेट नारायण राणे यांना
इशारा देत आपण माघार घेणार नाही हे जवळपास स्पष्ट केले आहे.