पॅरिसमध्ये सुवर्णस्पर्श नाहीच; हिंदुस्थानच्या 117 खेळाडूंच्या पथकाला फक्त 6 पदकेच

>> मंगेश वरवडेकर

हिंदुस्थानच्या 117 खेळाडूंच्या ऑलिम्पिक पथकाची आपली पॅरिस मोहीम सुवर्णस्पर्शाविनाच संपली. एकीकडे एक कोटी लोकसंख्या असलेल्या छोटय़ा छोटय़ा देशांना दहा-दहा सुवर्ण पदके जिंकता आली, तर हिंदुस्थानला एका रौप्यसह सहा पदकांवरच मायदेशी परतावे लागले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये 48व्या क्रमांकावर राहिलेला हिंदुस्थान पॅरिसमध्ये 71व्या क्रमांकावर घसरला.

टोकियोत हिंदुस्थानने एका सुवर्णसह सात पदके जिंकून ऑलिम्पिक कारकीर्दीतील सर्वाधिक पदकांचा विक्रम रचला होता. पॅरिसमध्ये हिंदुस्थानी पथकाकडून 10 ते 15 पदकांची अपेक्षा होती, पण हिंदुस्थानचे वीर मोक्याच्या क्षणी ढेपाळले.

टोकियोत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राला आपले पदक कायम राखता आले नाही, मात्र त्याने स्पर्धेतील एकमेव रौप्य जिंकले. नेमबाज मनू भाकरने दोन कांस्यपदकांवर अचूक नेम मारला. कुस्तीपटू विनेश फोगाटचे 100 ग्रॅम वजनवाढीमुळे हुकलेले पदक हिंदुस्थानसाठी सर्वात मोठा धक्का ठरला. महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेनेही पदक जिंकून पराक्रम केला.

विनेश फोगाटच्या याचिकेवर उद्या निर्णय

हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटचा पॅरिस ऑलिम्पिकमधील 50 किलो वजनी गटातील अपात्रतेबाबतचा निकाल आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद मंगळवारी सायंकाळी 6 पर्यंत देणार आहे.