केपटाऊनला जाडेजा, मुकेश खेळणार ? दुसऱया कसोटीसाठी हिंदुस्थानी संघात बदल होण्याची शक्यता

टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱयाच दिवशी पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. त्या पार्श्वभूमीवर बुधवार, 3 जानेवारीपासून सुरू होणाऱया दुसऱया कसोटी सामन्यासाठी हिंदुस्थानी संघात बदल अपेक्षित आहेत. रवींद्र जाडेजा व वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांना दुसऱया कसोटीत खेळवले जाऊ शकते.

दोन सामन्यांच्या मालिकेत 0-1ने पिछाडीवर पडलेल्या रोहित शर्माच्या सेनेचे लक्ष दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडविण्याकडे असेल. मात्र हिंदुस्थानला केपटाऊन कसोटी जिंकायची असेल तर आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये किमान दोन बदल करावे लागणार आहेत. रवींद्र जाडेजा तंदुरुस्त नसल्यामुळे सेंच्युरियन कसोटीत खेळू शकला नव्हता, मात्र दुसऱया कसोटीच्या पार्श्वभूमीवर तो नेटमध्ये कसून सराव करताना दिसतोय. जाडेजा संघात आल्यामुळे हिंदुस्थानच्या फलंदाजीची ताकद वाढेल. याचबरोबर त्याची अचूक टप्प्यावरील गोलंदाजी आफ्रिकन फलंदाजांना अडचणीत आणू शकते. पहिल्या कसोटीत अपयशी ठरलेल्या रविचंद्रन अश्विनच्या जागी जाडेजाचा संघात समावेश करू शकतो, असे चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे.

मात्र केपटाऊनची खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा हा अश्विन आणि जाडेजा या दोघांचाही प्लेइंग 11 मध्ये समावेश करू शकतो, मात्र त्यासाठी गेल्या सामन्यात पदार्पण करणारा प्रसिध कृष्णाला बाकावर बसावे लागेल. कारण कृष्णाने पहिल्या कसोटीत 20 षटकांत 93 धावांत एक विकेट घेतली होती. याचबरोबर शार्दुल ठाकूर बुधवारपर्यंत किती फिट होतो यावर त्याचे भवितव्य अवलंबून असेल. शनिवारी नेट सत्रादरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. तो पूर्णतः फिट झाला नाही तर वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला केपटाऊन कसोटीत संधी मिळू शकते.