बेस्ट विजेच्या लपंडावाने मुंबईकर हैराण; हेल्पलाईन बिनकामाची, वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष 

गेल्या पाच दिवसांपासून मुंबई शहरात बेस्टच्या विजेचा लपंडाव सुरू आहे. शीव प्रतीक्षा नगर, ऍण्टॉप हिल परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्यामुळे ऐन उकाडय़ात रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यातच बेस्टच्या हेल्पलाईन नंबरवर वारंवार फोन करूनही कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे.

बेस्ट उपक्रमाकडून परिवहन सेवेसोबत मुंबई शहरात वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून बेस्टच्या विजेचा लपंडाव सुरु असून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतायत. वीज गेल्यावर बेस्टच्या हेल्पलाईन नंबरवर फोन केला तर कोणी उचलत नाही. उचलला तर कोणी नीट उत्तर देत नाही. त्यामुळे ऐन उकाडय़ात वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. या प्रकरणी शिवसेनेचे शीव विधानसभा संघटक गजानन पाटील, माजी नगरसेवक रामदास कांबळे, शाखाप्रमुख संजय कदम, संजय म्हात्रे यांनी बेस्टच्या अधिकारी वर्गाशी वारंवार संपर्क साधला असता बेस्टकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली.

 तर जनआंदोलन उभारू  

बेस्टचे वाढते खासगीकरण, कामगारांचे अपुरे संख्याबळ तसेच विद्युत विभागात दुरुस्तीसाठी पुरेसे सामान नाही आणि ते खरेदी करण्यासाठी बेस्टकडे पुरेसे पैसे नाहीत अशी भयावह स्थिती आहे. लवकरच या विषयासंदर्भात आपण बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची भेट घेणार आहोत. सदर विषयाकडे बेस्टने गांभीर्याने लक्ष दिले नाही तर पुढील दोन दिवसांत आम्ही शीव विभागात आंदोलन करू, असा इशारा गजानन पाटील यांनी दिला.

खासगीकरणाने बेस्टची वाट लावली

बेस्टच्या वाहतूक विभागात बस आणि कर्मचारी यांचे मोठय़ा प्रमाणात खाजगीकरण झाले आहे. 2026 पर्यंत बेस्टची एकही बस शिल्लक राहणार नाही. त्यामुळे बेस्टचा अभियांत्रिकी विभाग पण हळूहळू बंद होत चाललाय. याबाबत आम्ही वारंवार आमच्या आमदारांच्या माध्यमातून अधिवेशनात आवाज उठवला. पालिका आयुक्तांना वेळोवेळी माहिती दिली, पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केला. परिवहनप्रमाणे बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाचेदेखील खासगीकरण झाले आहे, खासगी कंपनीच्या कर्मचाऱयांना कामही नीट येत नसल्यामुळे वीज दुरुस्ती करण्यासाठी वेळ लागतोय. त्यातच बेस्टमध्ये अदानी स्मार्ट मीटर लावत असून त्याला आम्ही विरोध केला होता, मात्र आता पालिकेवर प्रशासक असल्याने राज्य सरकार आपला मनमानी कारभार करत असल्याचेही सुहास सामंत म्हणाले.