विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरातील मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या उद्देशाने बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. केडगावच्या शिवाजीनगर जि.प. प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्र.२६७, २६९, २७० तसेच माळीवाडा परिसरातील हिराबाई सूर्यवंशी प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्र. २२१, २२२ या ठिकाणी हा प्रकार घडला आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी अहिल्यानगर शहर मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक प्रशासनाने वेबकास्टिंग केले होते. सदर वेबकास्टिंग करण्याचे काम मॅनेजिंग डायरेक्टर, आयनेट सिक्युअर लॅब प्रा. लि. चेन्नई या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीमार्फत नगर शहरामधील सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगकरिता आतील व बाहेरील बाजूमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम महेश सुभाष गवळी (वय ३२, रा. पागीरे पेट्रोल पंपाजवळ, घोडेगाव, ता. नेवासा) यांना देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी १६ नोव्हेंबरला रात्री साडेआठ वाजल्यापासून नगर शहरांतर्गत मतदान केंद्रांवरील प्रत्येक बुथवर वेबकॅमेरे बसवण्याचे काम सुरू केले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजीनगर, केडगाव येथील बुथ क्रमांक २६७ मधील आतील बाजूचा कॅमेरा तसेच बुथ २६९ येथील बाहेरील बाजूचा कॅमेरा, बुथ २७० बाहेरील बाजूचा कॅमेरा तसेच हिराबाई सूर्यवंशी प्राथमिक शाळा माळीवाडा, बुध २२२ बाहेरील बाजूचा कॅमेरा, बुथ २२१ बाहेरील बाजूला कॅमेरा बसविण्यात आला होता.
20 नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी सकाळी केडगाव येथील बुथवर लावलेले कॅमेरे काढण्याकरिता गवळी यांचे कर्मचारी गेले असता, ३ कॅमेरे दिसून आले नाहीत. त्यानंतर माळीवाडा येथील बुथवर लावलेले कॅमेरे काढण्याकरिता गेले असता, तेथील २ कॅमेऱ्यांची चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी महेश गवळी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.